संख : लग्नसराईच्या महिन्यातच लॉकडाऊनमुळे जत तालुक्यातील मंडप, साऊंड सिस्टिम, फोटोग्राफर, व्हिडिओ ग्राफर, डेकोरेटर्स, आचारी, वाजंत्री व्यावसायिकांना फटका बसला आहे. या व्यवसायात अनेकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. पण लॉकडाऊनमुळे मंडप, साऊंड सिस्टिम, डेकोरेशनचे साहित्य धूळखात पडले आहे. पुढे नोव्हेंबरपर्यंत मुहूर्त नाहीत. त्यामुळे सहा महिने करायचे काय हा प्रश्न या व्यावसायिकांसमाेर निर्माण झाला आहे.
तालुक्यात नोंदणीकृत मंडप व्यावसायिक, डेकोरेटर्सची संख्या २०५ आहे. दरवर्षी एप्रिल व मे महिने लग्नसराईचे दिवस म्हणून ओळखले जातात. यावर्षी एप्रिल, मे महिन्यात विवाह मुहूर्त होते. अनेक कुटुंबांनी दिमाखदार पद्धतीने विवाह समारंभ करण्याचा बेत केला होता. परंतु काेराेनाच्या पार्श्वभूमीवर विवाह साेहळे साध्या पद्धतीने उरकले जात आहेत. ९० टक्के विवाह सोहळे रद्द झाले आहेत. त्यामुळे लग्न समारंभासाठी घेतलेला ॲडव्हान्सही परत देण्याची वेळ मंडप व्यावसायिकांवर आली आहे. जी परिस्थिती मंडपवाल्यांची आहे. तीच परिस्थिती फोटोग्राफरचीही आहे. मंडप, साऊंड सिस्टिम, फोटोग्राफर, व्हिडिओ ग्राफर, केटरर्स, आचारी, फेटेवाले, डेकोरेटर्स, वाजंत्री या व्यावसायिकांना फटका बसला आहे. लग्नसराईच्या समारंभावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लग्नाच्या तारखा फुल्ल असल्यामुळे ऑर्डर रद्द कराव्या लागतात. मात्र यंदा शटर डाऊन करून यांनाही घरी बसवण्याची वेळ आली आहे. डिसेंबरपर्यंत मुहूर्त नाहीत. पुढचे सात महिने कसे जाणार ? याचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.
फेब्रुवारी ते मे या चार महिन्यात होणाऱ्या कमाईवर वर्षभराचा उदरनिर्वाह चालतो. म्हणून मंडप डेकोरेटर्स वाल्यांनी लाखो रुपये खर्च करुन साहित्य विकत घेतले आहेत. बँक, पतसंस्थांतून व्यवसायासाठी कर्ज काढली आहेत. मात्र नेमके याच कालावधीत काेरोनाचे संकट आल्याने साहित्य धूळखात पडले आहे.
पुढे नोव्हेंबरपर्यंत मुहूर्त नाहीत. पुढचे सहा महिने कसे जाणार हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
काेट
कोरोनाच्या संकटात उदरनिर्वाह करणे अवघड आहे. साहित्यासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. कर्ज काढली आहेत. शासनाने मदत देऊन दिलासा द्यावा, अशी आमची मागणी आहे.
- शिवाजी कृष्णा जाधव
अध्यक्ष, जत तालुका
मंडप, लाईट, फ्लॉवर्स डेकोरेशन व्यावसायिक असोसिएशन