प्रमोद रावळ ल्ल आळसंद गेल्या वर्षभरापासून महावितरणच्या आळसंद उपकेंद्रात सतत गैरहजर राहून शेतकऱ्यांना वेठीस धरणे, कार्यालयाच्या चाव्या घेऊन गायब होणे यासह अन्य प्रकारात नेहमी चर्चेत असणारे आळसंद येथील महावितरणचे शाखा अभियंता ए. ए. कांबळे यांना अखेर निलंबित केले. महावितरणने कांबळे यांच्यावर दुसऱ्यांदा निलंबनाची कारवाई केली आहे. कनिष्ठ अभियंता कांबळे यांच्या अकार्यक्षमेतवर प्रकाशझोत टाकल्यानंतर कांबळे यांना महावितरणने निलंबित केले.महावितरणच्या आळसंद उपकेंद्रात शाखा अभियंता ए. ए. कांबळे यांची वर्षभरापूर्वी नेमणूक केली होती. पहिल्यादिवशी कार्यालयात हजर राहून त्यांनी कार्यभार स्वीकारला. मात्र, दुसऱ्या दिवसापासून कांबळे यांनी उपकेंद्राला कुलूप ठोकून चाव्या घेऊन पोबारा केला. स्वत:कडील भ्रमणध्वनी बंद करून त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांनाही गुंगारा दिला. महिना, दोन महिने शोध घेऊनही कांबळे महावितरण अधिकाऱ्यांच्या हाती लागले नाहीत.याबाबत ‘लोकमत’ने ‘महावितरणचा अभियंता गायब’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. त्यानंतर महावितरणने शोध पथक तयार करून कांबळे यांचा शोध सुरू केला. त्यावेळी कांबळे कऱ्हाड येथे या पथकाच्या हाती लागले. त्यावेळी कांबळे यांना महावितरणने कामावर हजर करून घेतले. काही दिवसानंतर पुन्हा कांबळे यांनी पूर्वीचाच कित्ता गिरविण्यास सुरुवात केली. त्यामुळे कांबळे यांना निलंबित करून कार्यालयीन चौकशी सुरू केली.या चौकशीत महावितरण अधिकाऱ्यांनी कांबळे यांना पाठीशी घालत व केवळ कर्मचाऱ्यांची साक्ष ग्राह्य धरून चौकशीचा फार्स करीत त्यांची निर्दाेष मुक्तता करून त्यांना पुन्हा आळसंद उपकेंद्राचाच कार्यभार देण्यात आला. या प्रकारानंतर कांबळे यांनी महिन्यातून १० ते १५ दिवसच हजेरी लावून शेतकरी व ग्राहकांना वेठीस धरण्यास सुरुवात केली. गेल्या महिन्यात आठ दिवसांची रजा काढून महिना ते सव्वा महिना गैरहजर राहिले. त्यामुळे पुन्हा याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर कांबळे यांना दुसऱ्यांदा निलंबित करण्यात आले.
आळसंदचे शाखा अभियंता ए. ए. कांबळे अखेर निलंबित
By admin | Updated: July 1, 2014 00:40 IST