फोटो ओळी:-- देशिंग-हरोली (ता. कवठेमहांकाळ) येथे प्रा. प्रदीप पाटील यांचा प्रा. डाॅ. आबासाहेब शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिरढोण : साहित्यनिर्मिती करताना आपले वेगळेपण आणि क्षमतांचा विकास करून जगण्यातील अनुभवांचे चित्रण करावे. आपल्या क्षमतांची ओळखच आपल्याला सन्मान मिळवून देते, असे प्रतिपादन कवी प्रदीप पाटील यांनी केले.
बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठाने पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये कवी प्रदीप पाटील यांच्या ‘अंतरीचा भेद’ या कवितासंग्रहाची पाठ्यपुस्तक म्हणून निवड केल्याबद्दल देशिंग-हरोली (ता. कवठेमहांकाळ) येथे प्रदीप पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. चारुता सागर प्रतिष्ठाण, अभिव्यक्ती प्रतिष्ठाण, बहुजन हिताय संघ, लोकजागर प्रतिष्ठाध, चारुता सागर फाऊंडेशन, अग्रणी प्रतिष्ठाण या संस्थांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी प्रा. डाॅ. आबासाहेब शिंदे होते.
आबासाहेब शिंदे म्हणाले की, साहित्यिकांनी कसदार साहित्याचे वाचन मनन व चिंतन केल्यास साहित्याला एक उत्कृष्ट दर्जा प्राप्त होतो. त्यासाठी साहित्यातील बदलती भाषा संकल्पना अवगत करून निखळ आनंद देणारे साहित्य निर्माण करावे. सर्जेराव पाटील यांनी आभार मानले.
यावेळी प्रा. यशवंत माळी, महादेव माळी, कवी प्रा. सुनील तोरणे, किशोर दीपंकर, सुरेखा कांबळे, मनीषा रायजादे, मोहन खोत, मनीषा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यापसंगी प्रा. यशवंत माळी, प्रा. एस. एस. पाटील, राजेंद्र भोसले, ॲड. पृथ्वीराज पाटील, प्रा. सर्जेराव पाटील, गिरीश शेजाळ, गौसमहंमद मुजावर, आबासाहेब पाटील, मंगल पाटील उपस्थित होते.