सांगली : गोरगरिबांच्या चुली पेटवा आणि मगच लॉकडाऊन वाढवा, अशी हाक सेक्युलर मुव्हमेंटने दिली आहे. सततच्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणूस कोरोनाऐवजी उपासमारीनेच मरण्याची भीती निर्माण झाल्याची भावना प्रसिद्धीपत्रकातून व्यक्त करण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्ष कैलासकुमार काळे, सुरेश भंडारे आदींनी संगितले की, लॉकडाऊन वाढवताना गोरगरिबांच्या चुली बंद राहणार नाहीत, याचीही काळजी सरकारने घ्यायला हवी. उद्योग, व्यवसाय व बाजारपेठा बंद असल्याने रोजगार बुडाला आहे. कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन हा शंभर टक्के योग्य उपाय नाही. युद्धस्तरावर लसीकरण केल्यास साथ नियंत्रणात येईल.
लोकांनी घरातच राहण्यासाठी शासन पोलिसी बळाचा वापर करत आहे. जर स्थिती अशीच राहिली तर सामान्य माणूस रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. या प्रसिद्धीपत्रकावर दिलीप सासणे, ॲड. सुदर्शन कांबळे, विकास भंडारे, साहेबराव नितनवरे, दीपक गोंधळे, कुंदन सावंत, शैलेंद्र कांबळे यांच्याही सह्या आहेत.
चौकट
दरमहा १५ हजार रुपये द्या
लॉकडाऊन हटवणार नसाल तर गरिबांना महिन्याला १५ हजार रुपये मदत द्यावी. व्यावसायिक, छोटे उद्योजक, खासगी नोकरदारांना दरमहा १० हजार रुपये द्यावेत. घरगुती व बंद उद्योगांचे वीजबिल माफ करावे. खासगी रुग्णालयांत कोरोनाबाधितांना मोफत उपचार द्यावेत.