सांगली : महापालिका क्षेत्रातील अनेक मोठ्या योजना या काही लोकांच्या फायद्याकरिता करण्यात आल्या. त्यामुळे त्या मार्गी लागल्या नाहीत तर यापुढे प्रत्येक योजनेचे नागरिकांच्यावतीने समांतर ऑडिट करण्यात येणार आहे, अशी माहिती नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी दिली.
त्यांनी याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, महापालिकेच्या स्थापनेपासून कोणत्याही योजना पारदर्शीपणाने राबविल्या नाहीत. शहराचे व जनतेचे हित कशात आहे, याचा विचार झाला नाही. केवळ निवडणुकीत घातलेले पैसे वसूल कसे होतील, याचाच विचार अनेकांनी केला. शेरीनाला, वारणा उद्भव, ड्रेनेज, ई-गव्हर्नन्स, पाणी पुरवठा, जापनीज कर्ज, कंपोस्ट खत निर्मिती आदी योजनांची गत अशीच झाली. कोणाच्या तरी तुंबड्या भरण्यासाठी या योजना आणण्यात आल्या.
यापुढे असे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. महापालिका यापुढे ज्या खर्चिक योजना राबविणार आहे, त्यांचे समांतर ऑडिट नागरिकांना बरोबर घेऊन आम्ही करु. या कामात ज्यांना सहभागी व्हायचे आहे, त्यांनी संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहन साखळकर यांनी केले आहे.