भिलवडी : दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून चितळे समूहाने क्रांती केली. काकासाहेब चितळे यांनी उद्योगाबरोबर सामाजिक क्षेत्रात निर्माण केलेल्या विचारांचा वारसा पुढे नेऊया, असे आवाहन आमदार मोहनराव कदम यांनी केले.
भिलवडी (ता. पलूस) येथे काकासाहेब चितळे अभिवादन समितीच्या वतीने आयोजित प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी आ. कदम, उद्योगपती नानासाहेब चितळे, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, ज्येष्ठ नेते आनंदराव मोहिते, माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
नानासाहेब चितळे म्हणाले की, काकांनी उद्योगाबरोबर सामाजिक उपक्रमातून भिलवडीचा नावलौकिक पुढे नेला. त्यांच्या अकाली जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे गरजेचे आहे.
महेंद्र लाड म्हणाले की, चितळे समूहाने दूध उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतीला, उद्योगाला प्रोत्साहन दिले. नवउद्योजक घडविले. सार्वजनिक सामाजिक, शैक्षणिक, वाचन चळवळीत ते अग्रेसर राहिले.
या वेळी विश्वास चितळे, श्रीपाद चितळे, गिरीश चितळे, मकरंद चितळे, रघुनाथ देसाई, विलास पाटील, बाळासाहेब मोहिते, चंद्रकांत पाटील, राजेंद्र मोहिते आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत बी.डी. पाटील यांनी, सूत्रसंचालन सुभाष कवडे यांनी केले. शहाजी गुरव यांनी आभार मानले.
फोटो - काकासाहेब चितळे यांच्या प्रतिमेचे पूजन करताना आ. मोहनराव कदम, नानासाहेब चितळे, महेंद्र लाड, आनंदराव मोहिते, संग्राम पाटील, विश्वास चितळे, गिरीश चितळे आदी.