सांगली : सांगलीतील राजवाडा चौक परिसरात बुधवारी सकाळी बिबट्या आढळला. सकाळी साडे सातच्या सुमारास हा तेथील काही विक्रेत्यांना दिसला. याच भागातील रॉकेल लाईन परिसरात एका पडक्या घरात तो असल्याची शक्यता असून या परिसरात वन विभागाने जाळी लावून त्याचा शोध सुरू केला आहे.
शहरात बिबट्या आल्याचे वृत समजताच नागरिकांनी या परिसरात गर्दी केली होती. त्यामुळे हा संपूर्ण परिसर पोलिसांनी बंद केला आहे.बुधवारी सकाळी राजवाडा परिसरातील एका चहाच्या टपरीजवळून बिबट्या गेला. रात्रीच त्याने शहरात प्रवेश केल्याची शक्यता आहे. दरम्यान, तिथून त्याने रॉकेल लाईन परिसराकडे कूच केली.
हा परिसर अरुंद व दाटीवाटी असल्याने यंत्रणेला शोध कार्यात अडचणी येत आहेत. बिबट्या असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी हा परिसर वाहतुकीसाठी बंद केला. याच दरम्यान वन विभागाचे पथक आले. या भागात असलेल्या पडक्या घरात बिबट्या असल्याने त्यांनी लगेच तिथे जाळी लावून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.