अर्जुन कर्पे -कवठेमहांकाळ -महांकाली सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही मिनी विधानसभेची निवडणूक मानली जात असून, महांकालीच्या मैदानात भाजप-शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी आपली फौज उतरवली आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील-विजय सगरेंच्या विरोधात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. तर आबा-सगरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अजितराव घोरपडे, खासदार संजयकाका पाटील आणि जयसिंगराव शेंडगे याचे आव्हान परतवून लावण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. या निवडणुकीतील जय-पराजयाचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होणार, हे निश्चित आहे.महांकाली कारखान्याचे सभासद कर्नाटक, तासगाव, कवठेमहांकाळ, जत परिसरात मोठ्या संख्येने आहेत. सुमारे १२ हजार सभासद या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. महांकालीचे संचालक मंडळ सतरा संचालकांचे असून, यापैकी निवडणुकीआधीच संस्था गटातून सत्ताधारी पॅनेलचे युवा नेते गणपती सगरे बिनविरोध झाले आहेत, तर मागासवर्गीय गटातून सत्ताधारी पॅनेलचेच रामचंद्र जगताप बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे महिला गटातून दोन, तर अ वर्ग मधून १३ जागा अशा एकूण १५ जागांसाठी निवडणूक लागली आहे. सत्ताधारी महांकाली विकास पॅनेलने सर्व जागांसाठी उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.तर विरोधी राजारामबापू शेतकरी विकास पॅनेलने संजयकाका, अजितराव आणि जयसिंगरावांच्या नेतृत्वाखाली १५ जागांसाठी ८ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचाच, या हेतूने हे पॅनेलप्रमुख सभासदांपर्यंत पोहोचवून आपली भूमिका मांडत आहेत.एकूणच ही निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीची मिनी विधानसभाच असल्याचे चित्र तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात निर्माण झाले आहे. या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत विजय संपादन करायचा आणि महायुतीचे काका, सरकार, तात्या यांना नामोहरम करण्याचा चंग आबा-सगरे गटाच्या कार्यकत्यांनी बांधला आहे. कर्नाटकातील सभासदांवर जोरमहांकाली साखर कारखान्याचे शेजारच्या कर्नाटकातही सभासद आहेत. त्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी दोन्ही पॅनेलकडून रणनीती आखली जात आहे. आर. आर. पाटील यांनी अनंतपूर (ता. चिकोडी) येथे सभासदांचा मेळावा घेतला, तर भाजपने आमदार लक्ष्मण सवदी यांच्यामार्फत प्रयत्न चालविले आहेत.
महांकालीच्या रणात विधानसभेची बीजे
By admin | Updated: September 16, 2014 23:38 IST