लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरुड : चांदोली धरणातून सध्या शेतीसाठी पाणी सोडण्यात आले असून यावर्षीचे हे पहिलेच आवर्तन आहे. खुजगावजवळ जलसेतूचा जोड जीर्ण झाल्याने व पाण्याच्या दाबाने गळती लागली असून, यातून लाखो लीटर पाणी वाया जात आहे.
दरवर्षीप्रमाणे गेल्या चार दिवसांपासून वाकुर्डे उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू झाल्याने हे पाणी वारणा जलसेतूमधून पुढे जात असताना खुजगाव येथे जोडाचे रबर खराब झाल्याने लाखो लीटर वाया जात आहे. खराब झालेला रबर दुरुस्त न करता पाणी सोडण्यात येत आहे. गुरुवार, दि. ११ मार्च रोजी मध्यरात्री जलसेतूच्या डाव्या बाजूच्या जोडाचे रबर तुटले, तर शुक्रवारी सकाळी उजव्या बाजूचे रबर तुटले. यामुळे जलसेतूला मोठे भगदाड पडले आहे. लाखो लीटर पाणी वाहून जात आहे. हेच पाणी उभ्या पिकात पडत असून पिकांना धोका निर्माण झाला आहे. हे पाणी परिसरातील शेतीत पसरले आहे. याच ठिकाणाहून शेडगेवाडी, शिराळा, शेडगेवाडी, कोकरुडमार्गे मलकापूर, रत्नागिरी, कोल्हापूरला जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने नेहमी वाहनांची वर्दळ असते.