सांगली : राष्ट्रवादीचे काही नेते शिवसेनेत, तर काही भाजपमध्ये गेले असले तरी, जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीतच आहेत. ते आम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीत, असे मत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी व्यक्त केले. दि. २१ रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी, अपक्ष आणि जनसुराज्य सदस्यांची दि. १६ रोजी सांगलीत पक्षाच्या कार्यालयात बैठक घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.जत तालुक्याचे नेते विलासराव जगताप, खासदार संजय पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी भाजपमध्ये, तर खानापूरचे राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार अनिल बाबर, कवठेपिरानचे सदस्य भीमराव माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचा पक्षप्रवेश निश्चित झालेला नाही. राष्ट्रवादीतून बाहेर गेलेल्या नेत्यांच्या समर्थकांची सदस्यसंख्या नऊ आहे. हे सदस्य नेत्यांबरोबर पक्ष सोडून जाणार का, अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, नेत्यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडून कुठल्याही पक्षात प्रवेश केला, तरी जि. प. आणि पं. स. सदस्य पक्षाला सोडून जाणार नाहीत. ते पक्षाशी एकनिष्ठ राहणार असून जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार आहे. जि. प. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी दि. १६ रोजी सदस्यांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये पदाधिकारी निवडीवर चर्चा होणार आहे. राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांची संख्या ३३ आहे. दोन अपक्ष, जनसुराज्यसह राष्ट्रवादीची सदस्यसंख्या ३६ होत असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)जयंतराव-आबाच अध्यक्ष ठरविणारअध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. तासगावला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. शिराळा, जत तालुक्यातील महिला सदस्याही इच्छुक असल्यामुळे स्पर्धा वाढली आहे. सदस्यांशी चर्चा झाल्यानंतर गृहमंत्री आर. आर. पाटील आणि ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांची पुन्हा बैठक होणार आहे. यामध्ये जि. प. अध्यक्षाचे नाव निश्चित होणार आहे.
नेते कुठेही गेले तरी, सदस्य आमचेच
By admin | Updated: September 11, 2014 00:08 IST