सांगली : राज्य शासनाकडून झालेली निराशा, महापालिकेने एलबीटी वसुलीसाठी घेतलेला आक्रमक पवित्रा या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून सांगलीतील व्यापाऱ्यांनी एलबीटीविरोधात निर्णायक आंदोलनाची हाक देत बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. राज्य शासन व महापालिकेकडून ठोस हमी मिळाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धारही व्यापाऱ्यांनी केला आहे. त्यात महापालिकेनेही व्यापाऱ्यांविरोधात कर्मचाऱ्यांना मैदानात उतरविले आहे. कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने करीत महापौरांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. त्यामुळे आता महापालिका व व्यापाऱ्यांतील संघर्ष उफाळून येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दोन वर्षांपासून एलबीटीवरून सांगलीतील व्यापाऱ्यांनी आंदोलन हाती घेतले आहे. या कालावधित व्यापाऱ्यांकडे १७० कोटी रुपयांचा एलबीटी थकित असल्याचे सांगत प्रशासनाने वसुलीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. महापौर विवेक कांबळे, उपमहापौर प्रशांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरून एलबीटी वसुलीचे आदेश दिले आहेत. त्यातून व्यापारी विरुद्ध पदाधिकारी, प्रशासन असा नवा वाद निर्माण झाला आहे. एलबीटी न भरल्यामुळे पालिकेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. पहिल्या वर्षी ५० कोटी, तर यंदा ७० कोटी रुपयांची एलबीटी वसूल झाली आहे. दरमहा पाच कोटी रुपयांचे उत्पन्न एलबीटीतून मिळत आहे. त्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार देतानाही नाकीनऊ आले आहे. गेल्या आठवड्याभरात महापौरांनी वसुलीची सूत्रे हाती घेतल्यापासून या संघर्षाला धार चढली आहे. त्यात राज्य शासनाने एक एप्रिलऐवजी एक आॅगस्टपासून एलबीटी रद्द करण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांत निराशा पसरली होती. व्यापाऱ्यांनी एलबीटी भरण्याची तयारी दर्शविली, पण त्यासाठी काही अटीही घातल्या. त्यात दंड व व्याज माफीची मागणी केली. पण हा निर्णय पालिकेच्या हाती नाही. त्यामुळे महापौरांसह आयुक्तांनीही, एलबीटी भरण्यास सुरुवात करा, मगच त्यावर चर्चा होईल, असा पवित्रा घेत व्यापाऱ्यांना फटकारले होते. राज्य शासनाकडून झालेली निराशा, पालिकेच्या कारवाईविरोधात गुरुवारपासून बेमुदत उपोषणाचा निर्धार एलबीटी हटाव कृती समितीने केला आहे. गुरुवारी सांगली ‘बंद’ची हाक देण्यात आली असून, सकाळी गणपती मंदिरासमोर आरती करून या आंदोलनाची सुरुवात होईल. त्यानंतर स्टेशन चौकात बेमुदत उपोषणाला सुरुवात होणार आहे. (प्रतिनिधी)गुरनानींच्या आदेशालाही केराची टोपली‘फॅम’चे अध्यक्ष मोहन गुरनानी यांनी फेडरेशनच्या सर्व सभासदांना फेब्रुवारी महिन्यात एलबीटी भरण्याचे आवाहन केले होते. तसे पत्रही त्यांनी सर्व सभासदांना पाठविले आहे. या पत्रात, शासनाने एलबीटी रद्द केला नाही, तर असहकार चळवळ सुरू ठेवावी. महापालिकेकडे केवळ दहा रुपये एलबीटी भरून उर्वरित रकमेवर व्याज भरण्याची तयारीही व्यापाऱ्यांनी दर्शवावी, असे म्हटले आहे. या पत्रालाही सांगलीतील कृती समितीच्या सदस्यांनी केराची टोपली दाखविली आहे. ज्या ‘फॅम’च्या नावाखाली सांगलीतील व्यापारी आंदोलन करीत आहेत, त्यातच फॅम अध्यक्षांच्या आदेशाला मात्र ते मानत नाहीत. यावरून त्यांची दुटप्पी भूमिका उघड होते, असा गौप्यस्फोट उपमहापौर प्रशांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
एलबीटीप्रश्नी आजपासून व्यापाऱ्यांचा एल्गार
By admin | Updated: March 26, 2015 00:03 IST