लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात सध्या युवा नेत्यांचे जोरदार ‘लॉंचिंग’ सुरू आहे. बड्या राजकारणी घराण्यांतील ही धाकटी पाती पद्धतशीर सू्त्रे हाती घेत आहेत. सध्या ‘जय हो’ म्हणणारे कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत. मात्र, त्यांची ‘एन्ट्री’ खस्ता खाल्लेल्या महत्त्वाकांक्षी कार्यकर्त्यांच्या, दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील नेत्यांच्या मुळावर येणारी ठरली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक, दिवंगत ज्येष्ठ नेते पतंगराव कदम आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांचे नातू डॉ. जितेश, दिवंगत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित यांच्यासह काही युवा नेते राजकारणात उतरत आहेत. सध्या त्यांचे जोरदार ‘लॉंचिंग’ सुरू आहे.
जयंत पाटील यांना वडील राजारामबापूंकडून राजकारणाचा वारसा मिळाला. ते अत्यंत धोरणी, प्रबळ महत्त्वाकांक्षी असून, वीस वर्षांपूर्वीच ते राज्याच्या राजकीय सारीपाटावर पोहोचले आहेत. राजारामबापू उद्योग समूहातील साखर कारखाने, दूध संघ, बँक, शिक्षण संस्था, गारमेंट उद्योग त्यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षम झाले आहेत. त्यातच पक्षाची जिल्ह्यासह राज्याची धुरा त्यांच्याकडे आहे. पाटील यांनी स्वत:च्या मतदारसंघात कार्यकर्त्यांची फौज उभी केली. दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना पहिल्यांदा राजारामबापू उद्योग समूहात आणि नंतर राज्य पातळीवरील सहकारी संस्थांमध्ये वरिष्ठ पदे दिली, पण विधानसभा-विधानपरिषद किंवा लोकसभा-राज्यसभेवर संधी दिली नाही. माणिकराव पाटील, विनायकराव पाटील, दिलीपतात्या पाटील, पी. आर. पाटील ही काही वानगीदाखल नावे.
वाढत्या व्यापामुळे जयंत पाटील यांनी मुलांकडे काही जबाबदारी सोपवण्याचे ठरवलेले दिसते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे पुत्र प्रतीक पक्षाच्या आणि उद्योग समूहाच्या कार्यक्रमांत प्रकर्षाने दिसत आहेत. वडिलांच्या संपर्क दौऱ्यात सहभागी होत आहेत. त्यांचे हे ‘लॉंचिंग’ राजकारणातील पाऊलवाट समजली जात आहे.
मोहनराव कदम यांचे नातू डॉ. जितेश यांनाही राजकीय क्षेत्रातील उगवता चेहरा म्हणून पुढे आणले जात आहे. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे ते चुलत पुतणे, तर काँग्रेसचे दिवंगत माजी मंत्री मदन पाटील यांचे जावई आहेत. कदम आणि मदन पाटील गटाची ताकद आता त्यांच्यामागे आहे. एकेकाळी ‘पॉवरफुल’ असणाऱ्या मदन पाटील गटाची धुरा त्यांच्याकडे दिली जात आहे. काँग्रेसकडून सांगली लोकसभा किंवा सांगली विधानसभा मतदारसंघातून त्यांचे ‘लॉंचिंग’ करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अर्थात वसंतदादांचे नातू विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्यासह तगड्या इच्छुकांचे काय करायचे, हा प्रश्न उभा राहणार आहेच.
तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून २०२४ च्या निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून रोहित पाटील यांचे नाव आधीच जाहीर झाले आहे. आर. आर. पाटील तथा आबांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुमनताई सध्या येथे आमदार आहेत. सुमनताईंची राजकीय वाटचाल मर्यादित राहिल्याने पुत्र रोहित यांची राजकारणातील ‘एन्ट्री’ पक्की समजली जात आहे. आबांचे निकटचे सहकारी वर्षभरापासून या ‘लॉंचिंग’च्या तयारीला लागले आहेत.
चर्चा तर होणारच!
या तिघाही युवा नेत्यांची राजकारणात थेट एन्ट्री होत आहे. ज्यांच्याकडून राजकारणाचा वारसा मिळाला, त्यांच्या वाट्याला आलेला राजकीय संघर्ष या युवा नेत्यांच्या वाट्याला अजून तरी आलेला नाही. खस्ता खाल्लेले कार्यकर्ते मात्र या सहज प्रवेशामुळे अस्वस्थ आहेत. नेत्यांच्या नातेवाईकांनी राजकारणात जरूर यावे, पण गुणवत्ता आणि क्षमता सिद्ध करून. परिणामी लोकशाहीच्या आडून घराणेशाही लादण्याचा हा ‘करेक्ट कार्यक्रम’ कार्यकर्त्यांच्या मुळावर येणारा ठरणार नाही का, अशी चर्चा तर होणारच!
आर. आर. आबांची आठवण
आर. आर. पाटील तथा आबा सांगत, ‘माझ्यानंतर माझ्या घरातील कोणी आमदार होणार नाही. राजकारणात उमेदवारी करणार नाही. मला राजकारणात उभा करण्यात माझ्या कार्यकर्त्यांनी खस्ता खाल्ल्यात. त्यामुळे माझा कार्यकर्ताच माझा राजकीय वारसदार असेल.’ पण आबांच्या पश्चात त्यांच्या पत्नीला दोनदा उमेदवारी देऊन आमदार करण्यात आले. आबांनी स्थापन केलेल्या एकमेव सहकारी संस्थेचा म्हणजे स्वामी रामानंद भारती सूतगिरणीचा ताबा त्यांच्या कुटुंबियांनी घेतला. त्यांच्या पत्नी अध्यक्ष बनल्या. भावाला जिल्हा बँकेचे संचालकपद मिळाले. त्यांचे कोणतेही राजकीय आणि सामाजिक योगदान न तपासता!