लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : हुतात्म्यांच्या रक्तात भिजलेली माती विकू देणार नाही, अशी घोषणा करीत संयुक्त किसान आंदोलनाच्या वतीने जिल्ह्यात ‘मिठ्ठी सत्याग्रहा’चा प्रारंभ करण्यात आला. त्याची सुरुवात हणमंतवडिये (ता. कडेगाव) येथे क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील यांच्या उपस्थितीत गुरूवारी करण्यात आली.
देशभरातून स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या गावागावातून एक मूठ माती या मिठ्ठी सत्याग्रहाद्वारे संकलित करण्यात येणार आहे. दि. २६ नोव्हेंबरपासून शेतकरी लोकशाहीचा लढा रस्त्यावर लढतो आहे. हा लढा तीव्र करण्यासाठी ‘मिठ्ठी सत्याग्रह’ची घोषणा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सोनवडेत किसन अहिर व नानकसिंग शहीद, बिळाशी येथे शंकर कुंभार व धोंडी सुतार शहीद झाले. याशिवाय स्वातंत्र्य लढ्यात जेथे जेथे हुतात्मे झाले, तेथील ‘हुतात्म्यांच्या रक्तात भिजलेली माती आम्ही विकू देणार नाही’ अशी प्रतिज्ञा करून तेथील माती कलशात घेतली जाणार आहे. अशीच माती प्रतिसरकारचे नेते क्रांतिसिंह नाना पाटील यांचे येडेमच्छिंद्र आणि इस्लामपूर व ऐतवडे येथून बाबूराव कोकाटे आणि प्रताप पाटील यांची आठवण म्हणून तेथील माती कलशात घेतली जाणार आहे. ही सर्व माती क्रांतिकारकांनी सांगली जेल फोडून उड्या टाकल्या, तेथे फेरी काढून हुतात्मा आण्णासाहेब पत्रावळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शेतकरी नेते राजू शेट्टी, आमदार अरुण लाड, महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते आमराई येथे नेऊन त्यात वृक्षारोपण केले जाणार आहे.
या आंदोलनाची सुरुवात गुरुवारी हणमंतवडिये येथे करण्यात आली. यावेळी हौताताई पाटील यांच्याकडे क्रांतिकारकांच्या स्मृतीची माती कलशामध्ये भरून सुपूर्द करण्यात आली. यावेळी अॅड. सुभाष पाटील, प्रा. विलासराव पाटील, कॉ. धनाजी गुरव, कॉ. दिग्विजय पाटील, जयराम मोरे, संग्राम पाटील, धनाजी मोरे, सुखदेव मस्के, मोहन मोरे उपस्थित होते.