कोकरुड : येळापूर (ता. शिराळा) येथील कर्जदाराने सात वर्षांपूर्वी कर्जाची रक्कम भरून थकबाकी नसल्याचा दाखला घेऊनही सांगली जिल्हा कृषी ग्रामीण बहुउद्देशीय बँकेने (भू-विकास) पुन्हा थकबाकी असल्याची नोटीस बजावली आहे. यामुळे बँकेतील सावळा गोंधळ पुन्हा समाेर आला आहे.
येळापूर येथील बळवंत सावळा आटुगडे यांनी जिल्हा कृषी व ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकेचे (भू-विकास) गणेश पाणी पुरवठा योजनेसाठी कर्ज घेतले होते. अल्पभूधारक शेतकरी असलेल्या आटुगडे यांनी २१ जून २०१३ मध्ये या कर्जाची वनटाइम सेटेलमेंट योजनेंतर्गत परतफेड करून थकबाकी नसल्याचा दाखला घेतला होता. असे असतानाही आटुगडे यांना गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तुमची साडेआठ हजार थकबाकी असल्याचे पत्र मिळाले आहे. त्यांनी माेबाईलवरून संपर्क साधून याची माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांना दिली दिली. मात्र कागदपत्रांची चौकशी न करता तुम्हाला रक्कम भरावीच लागेल, असे सांगण्यात आले.
गणेश पाणीपुरवठा योजनेसाठी अनेक शेतकऱ्यांनी या बँकेला जमिनी तारण दिल्या हाेत्या. बहुतांश शेतकऱ्यांनी थकबाकी भरली असून, उरलेल्या थकबाकीदारांना पंधरा दिवसांत नव्याने नोटिसा आल्या आहेत. मात्र थकबाकी भरलेली असतानाही पुन्हा नोटीस आल्याने शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे. यानिमित्ताने भू-विकास बँकेतील सावळागोंधळ समोर आला आहे. थकबाकीदार नसल्याने आणि स्वच्छ चारित्र्य याआधारे आमदार मानसिंगराव नाईक यांनी बळवंत आटुगडे यांना गणेश पाणीपुरवठा योजनेचे दोनवेळा अध्यक्षपद देऊन काम करण्याची संधी दिली होती. थकबाकीदार असते, तर ते अध्यक्ष झाले असते का? असा सवाल शेतकरी, सभासद वर्गातून होत आहे.
काेट
मी आठ वर्षांपूर्वीच कर्जाची थकबाकी भरून तसा दाखला घेतला होता. तरीही यापूर्वी मला नोटिसा आल्या होत्या. मात्र काळजी करू नका, तुमच्याकडे वसुलीला येणाऱ्या व्यक्तीला 'नील' चा दाखला दाखवा, असे सांगितले असल्याने गप्प होतो. तरीही नोटिसा येणे सुरूच आहे.
- बळवंत आटुगडे
शेतकरी येळापूर.