मिरज -म्हैसाळ येथे पेट्रोल पंप व करोली (एम) येथील घर फोडून चोरट्यांनी लाखाचा ऐवज लंपास केला. याबाबत सूर्यकांत भगवान पाटील व विजय साळुंखे या दोघांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.
म्हैसाळ येथील एसआर पेट्रोल पंप शुक्रवारी पहाटे चोरट्यांनी लुटला. गुरुवारी रात्री पेट्रोल पंप बंद केल्यानंतर कामगार झोपले असताना शुक्रवारी पहाटे पेट्रोल पंपावरील २८ हजार रुपये रोख रक्कम लुटून चोरट्यांनी पोबारा केला. त्यावेळी पेट्रोल पंपाजवळ थांबलेल्या दोघांकडील दोन हजार रुपये किमतीचे मोबाईल देखील चोरट्यांनी हिसकावून नेले.
करोली (एम) येथे गुरुवारी रात्री सूर्यकांत भगवान पाटील यांच्या घराचा कडीकोयंडा काढून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरात सर्व झोपले असताना चोरट्यांनी कपाट फोडून कपाटातील अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ६९ हजार १०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. पाटील यांना शुक्रवारी पहाटे जाग आल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास आले. म्हैसाळ व करोली (एम) येथील चोरीप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून करोली (एम), सोनी परिसरात चोरी व लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत.