कोकरूड (ता. शिराळा) येथील वारणा नदीवरील कोकरूड-रेठरे बंधाऱ्याचे पिलरचे दगडी बांधकाम निसटू लागले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : कोकरूड (ता. शिराळा) येथील शिराळा-शाहूवाडी तालुक्यांना जोडणारा वारणा नदीवरील कोकरूड रेठरे बंधारा धोकादायक बनला आहे. बंधाऱ्याला १६ पिलर आहेत. त्यातील बहुतांश पिलरचे दगडी बांधकाम निसटू लागले आहे. बंधाऱ्यावरून वाहनांची नेहमी वर्दळ असते. अनुचित प्रकार घडण्यापूर्वी बंधाऱ्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
दोन जिल्ह्यांना व दोन तालुक्यांना जोडणारा हा बंधारा आहे. शाहूवाडी तालुक्यातील रेठरे, जोंधळेवाडी, भाराडवाडी, गोंडोली गावांसाठी दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. वाहतुकीसाठी सोयीस्कर आहे. चांदोली धरणामुळे वारणा नदीला बारमाही पाणी असते. बंधारा कधीही रिकामा होत नाही. सुमारे १५० फूट लांबीचा बंधारा आहे. बंधाऱ्याला १६ पिलर आहेत. त्यातील बहुतांश पिलरचे दगडी बांधकाम निसटू लागले आहे.
बंधाऱ्याची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात पूर आल्यानंतर तो वेळोवेळी पाण्याखाली जातो. इतर पिलरचेदेखील दगड ढासळून पिलर निराधार होण्याचा धोका आहे. बंधाऱ्याचे इतर पिलर निकामी होण्यापूर्वी पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती होणे गरजेचे आहे. पाटबंधारे विभागाने पुढील अनर्थ घडण्याअगोदरच या बंधाऱ्याची दुरुस्ती करावी. शिराळा व शाहूवाडी मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींनी मिळून लक्ष घालून तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.