मिरज : मिरजेत पावसाने ड्रेनेज यंत्रणेचा बोजवारा उडाल्याने ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचून राहत आहे. शहरातील छत्रपती शिवाजी क्रीडांगणाचा तलाव झाला आहे. मिरजेत ५० वर्षांपूर्वीच्या जुन्या व जीर्ण ड्रेनेज यंत्रणेमुळे पाणी निचऱ्याची समस्या कायम आहे. सुधारित ड्रेनेज योजना गेली अनेक वर्षे रखडल्याने पाण्याच्या निचऱ्याअभावी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी क्रीडांगणाच्या विकासासाठी महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र पावसाळ्यात मैदानात पाणी साचून चार महिने क्रीडांगण वापरासाठी बंद होते. रेल्वेस्थानकालगत प्रताप काॅलनी परिसरात ड्रेनेज यंत्रणा कुचकामी असल्याने दरवर्षी पावसाळ्यात येथे पाणी नागरिकांच्या घरात शिरते.
मिरज शहरातील ५० वर्षांपूर्वीच्या जुन्या ड्रेनेज यंत्रणेवर मोठा ताण आहे. मिरज शहर व विस्तारित भागासाठी सुधारित ड्रेनेज योजनेचे काम अपूर्ण असल्याने रेल्वेस्थानक, बसस्थानक आंबेडकर उद्यान परिसरासह शहरात अनेक भागांत ड्रेनेज तुंबल्याने रस्त्यावर साचणाऱ्या सांडपाण्याची समस्या आहे. निचऱ्याअभावी पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचते. शेकडो कोटी खर्चाच्या सुधारित ड्रेनेज योजनेसाठी मिरजेत नवीन वाहिन्या बसविण्यात आल्या आहेत. मात्र सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा अद्याप उभारण्यात आली नसल्याने योजनेचे काम रखडले आहे. ड्रेनेजच्या जुन्या व जिर्ण जलवाहिन्यांची तात्पुरती मलमपट्टी सुरू आहे. शहराच्या विस्तारित भागातही ड्रेनेज यंत्रणेअभावी सांडपाण्याची समस्या आहे. महापालिका प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे ड्रेनेज योजना रखडल्याने ड्रेनेज व सांडपाण्याच्या समस्येने नागरिक हैराण आहेत.