इस्लामपूर : राजारामबापू पाटील यांचे अनुयायी, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निकटचे सहकारी, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांचा अमृतमहोत्सवी सत्कार शुक्रवार, दि. २२ जानेवारी रोजी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्याहस्ते होणार असल्याची माहिती गौरव समितीचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांनी दिली.
कुरळप येथील पोलीस कवायत मैदानावर माजी राज्यपाल खा. श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि स्वागताध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. यावेळी ‘गाथा पांडुरंगाची’ हा गौरव अंकही प्रकाशित केला जाणार आहे.
ते म्हणाले, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आ. मानसिंगराव नाईक, खा. धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी, आ. मोहनराव कदम, आ. अरुण लाड उपस्थित राहणार आहेत.
पाटील म्हणाले, स्व. बापूंनी पी. आर. पाटील यांना १९६७ मध्ये वयाच्या २३ व्या वर्षी चिकुर्डे मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य, तर १९६८ मध्ये वयाच्या २४ व्या वर्षी तत्कालीन वाळवा सहकारी साखर कारखान्याच्या सरकार नियुक्त संचालक मंडळात संचालक म्हणून संधी दिली. ते गेल्या ५० वर्षांहून अधिक संचालक, उपाध्यक्ष व अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दहा वर्षे जिल्हा बॅँकेचे संचालक पदही भूषविले. त्यांनी कुरळपसह परिसरातील गावांच्या विकासात मोलाचे योगदान केलेले आहे.
फोटो - १९०१२०२१-आयएसएलएम-पी. आर. पाटील (सिंगल फोटो)