संख : कुलाळवाडी (ता. जत) येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत गेली पाच वर्षांपासून राजमाता अहिल्यादेवी वनराई वृक्ष संवर्धनाचा उपक्रम राबविला आहे. शाळेच्या परिसरात ५४० झाडांचे जतन व संंवर्धन केले आहे. पावसाळ्यात ही वनराई हिरवाईने नटलेली आहे.
शालेय परिसर, ग्रामपंचायत कार्यालय परिसर, कुलाळवाडीतील खंडोबा देवस्थान, बिरोबा देवस्थानच्या सुमारे दहा एकर हून अधिक परिसरावर व विद्यार्थ्यांद्वारे त्यांच्या घराच्या सभोवताली, शेताच्या
बांधावर परिसरात ४ हजार २६८ झाडांचे देशी प्रजातीच्या विविध वृक्षांचे जतन व संवर्धन करण्यात येत आहे.
शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांनी ग्रामस्थांच्या मदतीने श्रमदानातून सुमारे दोन हजार फूट पीव्हीसी व पाच हजार फूटहून अधिक भूमिगत ठिबक सिंचन पाईपलाईन केली आहे. विद्यार्थी दर वर्षी सुमारे एक लाखाहून अधिक बियांचे संकलन करून याद्वारे रोपवाटिका तयार केली आहे. तसेच सीड बॉल्स तयार करतात. यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भाव असून देखील विद्यार्थी व शिक्षकांनी ५० हजार सीड बॉल्स तयार केले आहेत. शाळेच्या या उपक्रमास ग्रामस्थ तसेच वृक्षप्रेमींचा भरघोस सक्रिय पाठिंबा लाभला आहे.
चाैकट
‘लोकमत’च्या लेखाची दखल
शाळेच्या आणि गावकऱ्यांच्या माध्यमातून होत असलेल्या जलसंधारण, वृक्ष संवर्धनाच्या कामाची दखल ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत घेण्यात आली होती. त्यातील लेख वाचून अमेरिकेत स्थायिक असलेले कोल्हापूरचे सचिन मिरजकर यांनी या कामाविषयी माहिती घेतली. सचिन मिरजकर, त्यांची पत्नी प्रज्ञा यांनी कोल्हापूरच्या नर्सरीतून स्वखर्चाने विविध प्रजातीची २०० रोपे पाठविले. जतचे युथ फॉर जत संस्थेचे संस्थापक व सध्या लंडनमध्ये स्थायिक असलेले अजय पवार यांनी उपक्रमाला सहकार्य केले आहे. तसेच परदेशात असणारे अभिजित मिरजकर, प्रमोद मंद्रे, सचिन ढमढेरे, संतोष महाजन, आशिष गोर, देवेंद्र सायखेडकर यांनीही मदत केली आहे.