सांगलीत मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयातील एक विभागप्रमुख टक्केवारीसाठी फारच कुप्रसिद्ध. एका प्रकल्पाचा धनादेश साहेबांनी अडवला होता. लाभार्थ्यांनी बऱ्याच मिनतवाऱ्या करूनही उपाय निघेना. एका हुश्शार कार्यकर्त्याने ‘आयडियाची कल्पना’ लढविली. लाभार्थी साहेबांना भेटायला आले. सोबत पेढ्याचा बॉक्स आणि प्रकल्पाच्या उद्घाटनाची निमंत्रण पत्रिका होती. उद्घाटक म्हणून पालकमंत्री जयंत पाटलांचे नाव पत्रिकेवर होते. उपस्थितांत टक्केवारीच्या साहेबांचेही नाव होते. पत्रिका पाहून ते उडालेच. खुद्द जयंत पाटीलसाहेब उद्घाटन करताहेत म्हटल्यावर पाचावर धारण बसली. एका मिनिटात धनादेश काढला. कार्यक्रमाला येण्याचे आश्वासनही दिले. आठवडाभरातच तो वटला, त्यानंतर लाभार्थ्यांनी फोन केला, ‘जयंत पाटील साहेबांना वेळ नसल्याने उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द केलाय’. साहेबाच्या हातातून सावज कधीच निसटले होते.
महापूर आवडे काहींना!
पूरहानीतील भरपाईच्या पैशांसाठी बारा भानगडी सुरू आहेत. सांगलीत एका कुटुंबाचे संसारोपयोगी साहित्य पाण्यात बुडाले. बाहेरगावी गेल्याने वाचवता आले नाही. पथकाने पंचनाम्यात नुकसानीच्या नोंदी झाल्या. दोन दिवसांनी पुढील गल्लीत पंचनाम्याला गेले. मागच्या गल्लीप्रमाणेच येथेही एका घरात साहित्याची हानी झाल्याचे दिसले. पथकाने नोंदी घेतल्या. परतताना कालच्या घरात गेले, तेव्हा घर रिकामे दिसले. तेथील साहित्य पुढील गल्लीतील घरात नेऊन ठेवले होते. अधिकाऱ्यांनी पितळ उघडे पाडले. साहित्याचे मालक नेमके कोण, हे सिद्ध करण्यास फर्मावले. आता दोन्ही कुटुंबांची धावपळ सुरू आहे.