वाळव्याचं राजकारण म्हणजे काही औरच. नेते जसे दणकेबाज, कार्यकर्ते त्याहून रगेल. राजकारण तर प्रत्येकाच्या अंगात भिनलेलं. हा किस्सा अशाच एका रगेल गावातला. जाहीर सभा, बैठकांसाठी गाव चावडी हीच ठरलेली जागा. त्यामुळे बोलणारे खुर्चीवर आणि समोर ऐकणारेही खुर्चीवरच. समोर नेता कितीही मोठा असला तरी गावकऱ्यांची बसायची स्टाईल ठरलेली. अगदी टेचात पायावर पाय टाकून बसायचे. जणू समोरचा वक्ता खिजगणतीतच नसावा. वाळव्याच्या मातीतल्या बड्या साहेबाला हे भलतेच झोंबायचे, पण इलाज सुचत नव्हता. कोणीतरी इगित सुचवली. एके दिवशी पेव्हिंग ब्लॉक भरुन ट्रक गावात आला. सिमेंट, वाळूही आली. दोन दिवसात चावडीसमोर ब्लॉक बसवून झाले. रंगीबेरंगी ब्लॉकमुळे चौक उजळला. सभा असेल तेव्हा लोक त्यावर मांडी घालून बसू लागले. भाषण करणारे साहेब खुर्चीवर, तर ऐकणारे खाली !
------------
.... नाहीतर ईडी बोलवतो
राजकारण्यांना धमक्या आणि खुन्नस नवी नसते. पण हल्ली धमक्यांची परिभाषाच बदलून गेली आहे. फौजदारी करतो, कोर्टात खेचतो अशा धमक्या आता जुन्या झाल्यात. परवा जिल्हा परिषदेत एकजण बोलता-बोलता म्हणाला, ‘लई मस्ती कराल तर ईडी बोलवीन!’ यावर सगळे त्याच्या तोंडाकडेच बघत राहिले.
-------------