सांगली : उन्हाळ्यात कृष्णा नदीची पाणी पातळी कमी होऊन शहरात पाणीटंचाई निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली आहे. त्यासाठी महापालिकेकडून कोयना प्रशासनाशी समन्वय राखणार आहोत. तसेच लवकरच पालकमंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत बैठक घेऊन नियोजनही केले जाईल, असे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी सांगितले.
महापौर सूर्यवंशी म्हणाले की, प्रत्येक उन्हाळ्यात कृष्णा नदीतील पाणी पातळी कमी झाल्याने सांगलीकरांना पाणीटंचाईचे संकट भेडसावते. त्यामुळे यंदा कृष्णा नदीत अपेक्षित पाणीसाठा राहावा, यासाठी लवकरच जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कोयनेच्या अधिकाऱ्यांसमवेत समन्वय बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत कृष्णेची पातळी कमी होताच तात्काळ कोयनेतून पाणी सोडण्याचे नियोजन केले जाणार आहे. तसेच वारणा धरणाबाबत सुद्धा नियोजन केले जाणार असून यामुळे सांगली आणि मिरजेचा उन्हाळ्यातील पाणीटंचाईचा प्रश्न निकालात निघणार आहे.