सांगली : जिल्ह्यासह धरण पाणलाेट क्षेत्रात पाऊस थांबला असून, कोयना व वारणा धरणांतून विसर्गही कमी करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कृष्णा नदीपातळीत घट होत आहे.
मागील चार दिवसांपासून कोयना धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू होता. त्यामुळे कृष्णेची पाणीपातळी २१ फुटांवर गेली होती. गुरुवारी कोयना धरणातून २० हजार ३४, तर वारणा धरणातून २ हजार ३५२ क्युसेकने विसर्ग सुरू हाेता. विसर्ग मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात आल्याने सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीपातळीत घट झाली. सांगलीच्या आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी आता १९ फुटांवर आली असून अंकलीत २४.७ फुटांपर्यंत पाणीपातळी खाली आली आहे.
जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस थांबला आहे. सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी गुरुवारी पावसाने उघडीप दिली होती. सायंकाळी अंशत: ढगाळ वातावरण होते. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार २२ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात अंशत: ढगाळ वातावरण व काहीठिकाणी पावसाचा केवळ शिडकावा पडण्याची शक्यता आहे.