विटा : विटा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोगाव (ता. पलूस) येथील जॅकवेलची साफसफाई करताना विटा नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना जॅकवेलच्या खोलीत अतिविषारी किंग कोब्रा निदर्शनास आला. पालिका कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून सर्पमित्राच्या मदतीने हा किंग कोब्रा सुरक्षितरित्या पकडून वनविभागाच्या ताब्यात दिला.
महापुराचे पाणी उतरल्यानंतर कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून जॅकवेल, स्वीच रूमसह परिसराची स्वच्छता करण्याचे काम हाती घेतले आहे. बुधवारी पाणीपुरवठा निरीक्षक अनिल पवार यांच्यासह पालिकेची स्वच्छता टीम घोगाव येथे सकाळी दाखल झाली. त्यावेळी जॅकवेलच्या विद्युतीकरण विभागाच्या परिसराची स्वच्छता झाल्यानंतर जॅकवेलच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले. त्यावेळी कर्मचाऱ्यांना खोलीत भला मोठा किंग कोब्रा निदर्शनास आला. कर्मचाऱ्यांनी सर्पमित्र आणि वनविभागाला याची माहिती दिल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी सर्पमित्राला घेऊन घोगाव जॅकवेलवर आले. त्यानंतर अथक प्रयत्नानंतर सर्पमित्राने नागाला पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले. त्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आणि जॅकवेलची साफसफाई सुरू केली.
फोटो - २८०७२०२१-विटा-किंग कोब्रा : विटा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोगाव येथील जॅकवेलमध्ये शुक्रवारी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना नाग दिसून आला.