खरसुंडी : तीर्थक्षेत्र खरसुंडी येथील परिसरात अनेक ठिकाणी कामाच्या प्रारंभाचे नारळ निवडणुकीपूर्वी फोडले गेले. अनेक नेत्यांनी आश्वासनांचा पाऊस पाडला. परंतु प्रत्यक्षात कोणतेही विकासकाम करण्यास आजी-माजी आमदार, नेत्यांना वेळ मिळाला नाही. खरसुंडी येथे श्री सिद्धनाथाचे देवस्थान विकासाकडे सर्वच नेत्यांचे दुर्लक्ष आहे.आटपाडी तालुक्याला जोडणारा खरसुंडी-बनपुरी-आटपाडी हा रस्ता खराब असून, गेली कित्येक वर्षे या रस्त्याची अवस्था वाईट आहे. या रस्त्याने प्रवास करताना अनेक यातना सहन कराव्या लागत आहेत. अनेक वर्षे या रस्त्यासाठी राजकारण केले जात आहे. भिवघाट ते खरसुंडी हा रस्ताही निकृष्ट असून, ठिकठिकाणी खड्डे आहेत. खरसुंडी-झरे, खरसुंडी-लेंगरे या रस्त्यांची अवस्था वाईट आहे.खरसुंडी ग्रामपंचायतमध्ये कायम काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता आहे. तालुक्यात राष्ट्रवादी सत्ता कायमची असूनही खरसुंडी तीर्थक्षेत्रास भरीव निधी आजतागायत मिळाला नाही. निधी उपलब्ध झाला नाही. तीर्थक्षेत्राचा विकास करुन दळणवळण वाढेल, सुशिक्षितांना रोजगार मिळेल, अशी कोणतीही योजना या ठिकाणी राबवली जात नाही. गेली कित्येक वर्षे आमदार, खासदार, मंत्री खरसुंडीत श्री नाथांच्या चरणी कौल लावण्यासाठी आणि प्रचाराचा नारळ फोडण्यासाठीच येऊन गेले. अनेक नेत्यांचे कुलदैवत असलेल्या या मंदिराकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसून, नेहमीच त्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येथे चांगले रस्ते नाहीत, स्वच्छ पाणी नाही, स्वच्छतेचा अभाव असून अनेक भाविकांना हाल-अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.आमदार अनिल बाबर निवडून आल्याने लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांनी निवडणुकीपूर्वी खानापूर-आटपाडी तालुक्यातील अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न सोडवण्याचे आणि विकासकामे करण्याचे जाहीर केले आहे. खरसुंडी तीर्थक्षेत्राच्या विकासास त्यांनी प्राधान्य देऊन विशेष लक्ष द्यावे, अशी जनतेची मागणी आहे. खरसुंडीत वर्षातून दोन मोठ्या यात्रा भरतात. तीर्थक्षेत्राच्या विकासामुळे सुशिक्षितांच्या हाताला काम मिळून रोजगार उपलब्ध व्हावा, यादृष्टीने विशेष लक्ष घालून बाबर आणि प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. (वार्ताहर)निधीच्या केवळ घोषणाचखरसुंडी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी सहा कोटी मंजूर असल्याची चर्चा, रमेश शेंडगे फंडातून जनाई मंदिर जीर्णोध्दार व सभागृह दहा लाख, जोगेश्वरी मंदिर परिसर सुशोभिकरण ५ लाख निधी, पेव्हिंग ब्लॉक एक कोटी ९० लाख निधी खरसुंडी परिसरातील अंतर्गत पाईपलाईनसाठी मिळाल्याची चर्चा.
खरसुंडी देवस्थान विकासाकडे दुर्लक्ष
By admin | Updated: October 29, 2014 00:12 IST