सांगली : महापालिका क्षेत्रात घरगुती गॅस वितरणासाठी पाईपलाईनचे काम सुरू आहे. त्यासाठी चार पोट ठेकेदार नेमले आहेत. मुख्य ठेकेदार नामानिराळा असून टक्केवारीच्या साखळीत सांगली शहराशी धोकादायक खेळ सुरू आहे. याची जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशी करावी, असा मागणी माजी नगरसेवक गौतम पवार यांनी शुक्रवारी केली.
ते म्हणाले, महापालिका क्षेत्रातील घराघरात गॅस पाईपलाईनव्दारे देण्याच्या योजनेला आमचा विरोध नाही. मात्र ज्या पद्धतीने काम सुरु आहे, ते धोकादायक आहे. हाती आलेल्या माहिती व कागदपत्रानुसार, भारत पेट्रोलियम कार्पोरेशनने डी. एस. एंटरप्रायजेसला हे काम दिले. त्यांनी मनोरमा इको पॉवर कंपनीला पोट ठेका दिला. मनोरमा कंपनीने बाबर नावाचा स्थानिक ठेकेदार नेमला. त्यांनीही आणखी एक ठेकेदार नेमला आहे. अशा पद्धतीने ठेक्याची साखळी करणे हेच बेकायदेशीर आहे.
कोणत्याही ठेक्याचा पोटठेका देण्यामुळे टक्केवारीत वाढ आणि कामाला प्रत्यक्ष उपयोगात येणारा निधी कमी होतो. ही गॅसची पाईपलाईन आहे. अतिशय ज्वलनशील गॅस आहे. शहरात ज्या पद्धतीने बेदरकारपणे कुणीही, कुठेही खुदाई करत असतो, ते पाहता सध्याच्या कामाचा दर्जा, पाईपलाईची खोली कोणी तपासायची? स्थानिक पातळीवर त्याचे संपूर्ण नियंत्रण कोण करत आहे? या साऱ्याचा पंचनामा होण्याची गरज आहे. जोवर सध्या झालेल्या कामाचे ऑडिट होत नाहीत तोवर पुढचे काम होऊ नये, अशी दक्षता जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी घ्यावी, अशी मागणी केल्याचे पवार यांनी सांगितले.
चौकट
ठेकेदाराच्या कामगारांकडून दमदाटी
गौतम पवार म्हणाले, सांगलीतील काही जणांनी नेमकी कामाची पद्धत, त्याचे अंदाजपत्रक जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना तेथील सुपरवायझर व अन्य मंडळींनी दमदाटीची भाषा वापरली. हे काम बड्या लोकांचे आहे, तुम्ही लक्ष घालू नका, त्रास होईल, अशा धमक्या दिल्या गेल्या.