लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहरात आठवड्यातून दोनवेळा भरणारा बाजार, गणेश मंडई, गोसावी रुग्णालयासमोरील गर्दी आणि पार्किंगमुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. बाजारहाट करणाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच चालावे लागते. दरम्यान, विक्रेत्यांना लोकप्रतिनिधींचाच पाठिंबा असल्याने बाजार आणि भाजी मंडईचा खेळखंडोबा झाला आहे.
गणेश मंडईजवळ वाहतुकीची कोंडी होते. गर्दीचा विचार करून नगरपालिका प्रशासनाने डांगे चौकात मार्केटची उभारणी केली आहे. मात्र, व्यापारी तेथे जाण्यास तयार नाहीत. यावरून आता लोकप्रतिनिधींमध्येच राजकारण पेटले आहे. तीस वर्षांपूर्वीची परिस्थिती आजही जैसे थे असल्याने गणेश भाजी मंडई गर्दीच्या आणि वाहनांच्या विळख्यात सापडली आहे. त्यामुळे मंडई हलविणे हाच पर्याय पालिकेकडे आहे; परंतु काही लोकप्रतिनिधी मतांची पुंजी सांभाळण्यासाठी भाजी विक्रेत्यांची पाठराखण करत आहेत.
अशीच अवस्था आठवडा बाजाराची आहे. तहसील कार्यालय परिसरात नेहमी वर्दळ असते. बाजार आणि सायंकाळी भरणाऱ्या बाजारात भाजी व फळ विक्रेते रस्त्यावरच स्टॉल थाटतात. यावेळी खरेदीसाठी येणाऱ्यांची वाहनेही रस्त्यावरच लागतात. काही विक्रेते लोकप्रतिनिधींचे संबंधित असल्याचे सांगतात, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही. परिणामी वाळवा बझार, अजिंक्य बझार यांच्यासमोर नेहमी वाहतुकीची कोंडी होत आहे. तेथे वाहतूक पोलीस कार्यरत असतात. दोन्ही बाजूला बॅरिकेट्सही लावली आहेत. मात्र, वाहनचालक याची दखल घेत नाहीत. पोलीसही जुजबी कारवाईवर समाधान मानतात.
कोट
वाढती लोकसंख्या, उपनगरांचा विचार करून मार्केटच्या नियोजनाची जबाबदारी पालिकेवर आहे. प्रशासनाने भाजी व फळे विक्रेत्यांना परवाना देऊन नियोजन करावे. त्यामुळे बाजार आणि भाजी मार्केटमध्ये वाहतुकीची कोंडी होणार नाही.
- कपिल ओसवाल, माजी नगरसेवक
इस्लामपूर नगरपालिका लोगो