संख : जत तालुक्यात ६५ हजार ७०० हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार आहे. यापैकी सर्वाधिक ३७ हजार हेक्टरवर बाजरी पिकाची पेरणी होती. त्यानंतर उडीद, मटकी, तुरीची पेरणी होत असल्याचे चित्र आहे. खरी हंगामातील पेरणीसाठी बियाणे, रासायनिक खते उपलब्ध झाली आहेत. कोरोना संकटातही शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी मशागती करून सज्ज झाला आहे.
जत तालुक्यात मान्सूनपूर्व दोन चांगले पाऊस झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांची नांगर मारणे, कुळव मारणे, जमीन स्वच्छ करणे, आदी कामे सुरू आहेत. जून महिन्यात मृग नक्षत्राचा पाऊस होतो. खरीप पेरणीसाठी बी-बियाणे, खते कीटकनाशके व इतर साहित्य खरेदी करण्याची जुळणी करीत आहेत. कोरोनामुळे पेरणीसाठी बी-बियाणे, खते यांची जुळवाजुळव करताना अडचणी निर्माण झाल्या आहेत.
बैलजोड्यांचे प्रमाण घटल्याने ट्रॅक्टरच्या साह्याने शेतीची नांगरणी व इतर मशागतीची कामे केली जात आहेत; पण शेतकरी बैलजोडीच्या साहाय्याने पेरणीकडे कल आहे. बैलजोडीच्या पेरणीने उगवण चांगली होते. खरीप हंगामाची पेरणीसाठी बी-बियाणे, खते खरेदी, पेरणी, औजारे तयार करण्याच्या कामात गुंतला आहे.
चौकट
खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज
कृषी विभागाकडून १ जून ते ७ जूनपर्यंत बीज प्रकिया शेतकऱ्यांना करून दिली जाणार आहे. प्रतिकिलो १४ रुपये आहे. यामुळे पिकांना दोन महिन्यांपर्यंत किडीचा प्रादुर्भाव होत नाही. उत्पादनात किमान १० टक्के वाढ अपेक्षित आहे. बांधावर खत, बियाणे यासाठी आपल्या गावातील गटाकडे नावनोंदणी करून संबंधित कृषी साहाय्यकाकडे मागणी करावेत, अशी माहिती कृषी अधिकारी हणमंत मेडीदार यांनी दिली.
कोट
सध्या बैलजोड्यांचे प्रमाण घटल्याने ट्रॅक्टरच्या साह्याने शेतीची नांगरणी व इतर मशागतीची कामे केली जात आहेत. जोराचा पाऊस झाल्यावर पेरणीला सुरुवात होणार आहे.
-ईराप्पा आप्पाण्णा कोरे.
माडग्याळ
शेतकरी.
चौकट
जत तालुक्यातील चित्र
- तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र - २ लाख २४ हजार ८२४ हेक्टर
- तालुक्यातील खरिपाची पेरणी - ६५,७०० हेक्टर
- तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान - ४२७.५ मिलिमीटर
- लागवडीचे क्षेत्र - १ लाख ५८ हजार ७०० हेक्टर
- सर्वाधिक पेरणी बाजरी पिकाची - ३७ हजार हेक्टर.
चौकट
खरीप हंगामातील पीकनिहाय क्षेत्र
पिकाचे नाव : क्षेत्र (हेक्टरमध्ये) बाजरी : ३७०००, मका : १३५०, मूग : १९८०, उडीद : १०००, तूर : १३८०, सोयाबीन : २०००, सूर्यफूल : १५८०, भुईमूग : २२००.