मिरज : तालुक्यातील खंडेराजुरी येथे सोसायटी निवडणुकीच्या वादातून भाजप तालुकाध्यक्ष दिनकर भोसले यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. दगडफेकीचा जाब विचारल्याबद्दल भोसले यांचे समर्थक तानाजी काटे यांना बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सातजणांविरूध्द ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडेराजुरीत ब्रह्मनाथ सर्व सेवा सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीप्रणित पॅनेलने काँग्रेस व भाजप गटाचा पराभव केला. निवडणूक निकालानंतर बुधवारी रात्री विजयी गटाची मिरवणूक पार पडल्यानंतर भाजप तालुकाध्यक्ष दिनकर भोसले यांच्या घरावर अज्ञातांनी दगडफेक केली. भोसले यांचे समर्थक तानाजी काटे यांच्या घरासमोर फटाके वाजविण्यात आले. फटाके वाजवून पळून जाणाऱ्या तरूणांना तानाजी काटे यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्वांनी मोटारसायकलवरून पलायन केले. गुरूवारी सकाळी तानाजी काटे शेतात गेल्यानंतर त्यांना महेंद्र रूपनर याने, ‘रात्री शिवीगाळ का केली?’ अशी विचारणा करून मारहाण केली. महेंद्र रूपनर याच्यासह मुरसिध्द गुंडाप्पा रूपनर, नवनाथ रूपनर, आनंद मारूती रूपनर, अण्णासाहेब विठ्ठल रूपनर, गोरख भरमू रूपनर, विठ्ठल बंडा रूपनर यांनी काठ्या, लोखंडी गज, पाईप व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची तक्रार आहे.मारहाणीच्या घटनेमुळे भाजप समर्थकांची पोलिस ठाण्यात गर्दी होती. तानाजी आकाराम काटे यांनी शेजारी असलेली चार एकर शेतजमीन विकत घेतल्याचा राग असल्याने रूपनर यांनी मारहाण केल्याचे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी दंगल व मारामारीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणास अटक झालेली नसल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)
खंडेराजुरीमध्ये सोसायटी निवडणूक वादातून दगडफेक
By admin | Updated: May 20, 2016 23:38 IST