मिरज : मिरजेत भाजपचे आ. सुरेश खाडे यांनी ६४ हजार मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला. काँग्रेसचे सिध्दार्थ जाधव त्यांना २९ हजार व अपक्ष सांगलीकर व शिवसेनेच्या तानाजी सातपुते यांना २० हजारावर मते मिळाली. सलग दुसऱ्या विजयानंतर भाजप समर्थकांनी मतमोजणी केंद्रापासून आ. खाडे यांची विजयी मिरवणूक काढून जल्लोष केला. आ. सुरेश खाडे यांच्याविरोधात शिवसेना उमेदवार असल्याने मतविभागणीमुळे चुरशीची लढत होण्याचा अंदाज फोल ठरवित आ. खाडे यांनी मोठे मताधिक्य घेतले. शहरासह ग्रामीण भागातील प्रत्येक गावात आ. खाडे यांनी मताधिक्य मिळविले. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत आ. खाडे यांनी २ ते ३ हजाराचे मताधिक्य मिळविले. केवळ १३ व्या फेरीत काँग्रेसचे सिध्दार्थ जाधव यांनी खाडे यांच्यापेक्षा दीड हजार मतांची आघाडी घेतली. मिरज विधानसभेसाठी १ लाख ८२ हजार ६६५ एवढे मतदान झाले होते. झालेल्या मतदानापैकी ५१.३४ टक्के मते खाडे यांना मिळाली. ग्रामीण भागात आ. खाडे यांच्यानंतर काँग्रेस बंडखोर अॅड. सी. आर. सांगलीकर यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. मात्र शहरात काँग्रेसचे सिध्दार्थ जाधव यांना काँग्रेसची पारंपरिक मते मिळाल्याने सिध्दार्थ जाधव दुसऱ्या क्रमांकावर आले. शिवसेनेच्या तानाजी सातपुते यांना २० हजार व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब होनमोरे यांना केवळ १० हजार मते मिळाली. आ. खाडे निष्क्रिय असल्याची विरोधकांकडून निवडणुकीपूर्वी जोरदार टीका होत होती. मात्र आ. खाडे यांच्यावरील टीकेचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे निकालातून स्पष्ट झाले. शिवसेना उमेदवार तानाजी सातपुते यांना २० हजार मते मिळाल्यानंतरही आ. खाडे यांना गतवेळेएवढीच मते मिळाली. गत विधानसभा निवडणुकीत ५४ हजार मताधिक्याने विजय मिळविणाऱ्या आ. खाडे यांनी यावेळी तब्बल ६४ हजार मताधिक्याने विजय मिळवित विरोधकांना चितपट केले. आज दुपारी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी सुचिता भिकाणे यांनी आ. खाडे यांना निवडीचे प्रमाणपत्र दिले. संजय पाटील, नीता केळकर यांच्यासह भाजप नेत्यांनी आ. खाडे यांचे अभिनंदन केले. कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत मतमोजणी केंद्रात जल्लोष केला. मतमोजणी केंद्रापासून फटाक्यांच्या आतषबाजीत आ. खाडे यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. आज सकाळी मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर आ. खाडे यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. (वार्ताहर)दंगलीचा अपप्रचार करणाऱ्यांना चपराकमाझा विजय कार्यकर्त्यांचा व मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेचाही मला फायदा झाला. गतवेळी दंगलीमुळे मी निवडून आल्याचा अपप्रचार करणाऱ्यांना निवडणूक निकालाने चपराक मिळाली आहे. -सुरेश खाडे, भाजप उमेदवार.मोदींच्या प्रभावाचा विजयखाडे यांच्या विरोधात नाराजी होती. मोदींंच्या लाटेमुळे ते अनपेक्षितपणे निवडून आले आहेत. हा विजय मोदी यांच्या प्रभावाचा आहे. -प्रा. सिध्दार्थ जाधव, काँग्रेस उमेदवार.मतदारांचा कौल मान्यमतदारांचा कौल आम्हाला मान्य आहे. कमी कालावधित मिरज विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलो. -सी. आर. सांगलीकर, अपक्ष उमेदवार.सोळाजणांची अनामत जप्तनिवडणुकीत झालेल्या १ लाख ८२ हजार ६६५ मतदानापैकी ९३ हजार ७९५ (५१.३६ टक्के) मते आ. खाडे यांना मिळाली. उर्वरित सर्व १६ उमेदवारांना मिळालेल्या ७५ हजार १९० मतांपेक्षा खाडे यांचे १४ हजाराचे मताधिक्य आहे. आ. खाडे वगळता काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, अपक्षासह सर्व १६ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. राष्ट्रवादीच्या बाळासाहेब होनमोरे यांच्यासाठी जयंत पाटील यांनी फिल्डिंग लावली होती. राष्ट्रवादीचे नगरसेवक पूर्व भागातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी होनमोरे यांच्या प्रचारात सहभागी होते. घोरपडे यांच्या मिरज पूर्व भागातील समर्थकांनीही राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याची चर्चा होती. मात्र राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी भाजपचेच काम केल्याचे स्पष्ट झाले.निकालानंतर शिवसेना उमेदवार तानाजी सातपुते आणि काँग्रेसचे सिध्दार्थ जाधव यांनी मतदान यंत्रात गोंधळ करण्यात आल्याने शिवसेनेची मते भाजपला गेल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली. शिवसेनेची हक्काची मते असलेल्या ठिकाणीही भाजपला आघाडी मिळाल्याने मतदान यंत्रात केलेल्या फेरफाराच्या चौकशीची मागणी तानाजी सातपुते यांनी केली आहे. सातपुते यांच्या तक्रारीमुळे निकाल विलंबाने जाहीर करण्यात आला.
खाडेंना मताधिक्य ६४ हजारांचे
By admin | Updated: October 20, 2014 00:42 IST