प्रताप बडेकर-कासेगाव -लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडले. कासेगाव जि. प. मतदारसंघ व नेर्ले जि. प. मतदारसंघात शिवाजीराव नाईकांना निर्णायक मतांची आघाडी मिळाली. माजी जि. प. अध्यक्ष देवराज पाटील, विद्यमान जि. प. उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, वाळवा पंचायत समितीचे सभापती रवींद्र बर्डे ही त्रिमूर्ती पुन्हा एकदा ‘सुपर फ्लॉप’ ठरली. याची रंगतदार चर्चा सुरू आहे.माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून वाळवा तालुक्याला जवळजवळ ४0 वर्षांनंतर जि. प.चे अध्यक्षपद देवराज पाटील यांच्यारूपाने मिळाले होते. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी लिंबाजी पाटील यांना जि. प. उपाध्यक्षपद, तर वाळवा पंचायत समिती सभापतीपदी रवींद्र बर्डे यांना पुन्हा संधी दिली. मात्र या संधीचा फायदा मात्र या त्रिमूर्तींना घेता आलेला नाही. लोकसभा निवडणुकीमध्येही प्रतिष्ठेच्या लढाईत हे तिन्ही शिलेदार निष्प्रभ ठरले होते. त्यावेळी राजू शेट्टी यांना या मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळाले होते. या विधानसभा निवडणुकीत कासेगाव जि. प. मतदारसंघातून राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक यांना ८३२८ मते मिळाली, शिवाजीराव नाईक यांना ९७३७ इतकी मते मिळाली आहेत, तर सत्यजित देशमुख यांना २४३२ इतकी मते मिळाली. म्हणजेच राष्ट्रवादीच्या विरोधात ३८४१ इतकी मते गेली आहेत. तसेच नेर्ले जि. प. मतदारसंघात मानसिंगराव नाईकांना ६३0८, शिवाजीराव नाईकांना ६५७३ इतकी मते मिळाली, तर सत्यजित देशमुख यांना १८२९ मते मिळाली. या ठिकाणीही २३२७ मते विरोधात गेली आहेत. तसेच वाटेगाव या रवींद्र बर्डे यांच्या गावातून १३२९ चे निर्णायक मताधिक्य शिवाजीराव नाईकांना मिळाले आहे. एकूणच या राष्ट्रवादीच्या शिलेदारांना लोकांनी नाकारले आहे. त्यामुळे त्यांच्यावर आत्मपरीक्षणाची वेळ आली, हे निश्चित.माजी जि. प. अध्यक्ष देवराज पाटील यांनी प्रचार सांगता सभेत कासेगावातून २५00 चे मताधिक्य मानसिंगराव नाईक यांना देणार, असे जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात अवघे ७२ चे मताधिक्य नाईक यांना मिळाले. त्यामुळे देवराज पाटील बॅकफूटवर आले आहेत.
कासेगाव, वाटेगाव, तांबवेची त्रिमूर्ती फ्लॉप
By admin | Updated: October 29, 2014 00:14 IST