अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : आर लेका, आपल्या पालिकेची सभा ऑनलाईन हाय की, नोटिफिकेशन निघालंय. आपापल्या ऑफिसमध्ये बसून सभा ऑनलाईन करूया, गटनेत्यांचे फर्मान. काहीजण बसले रानातल्या गोठ्यात, काही अलिशान गाडीत; तर काहींचा मुक्काम पोल्ट्री फार्मवर. या मीटिंगमध्ये शांतता तर सोडाच; नगरसेवकांचे ‘वरून कीर्तन - आतून तमाशा’ असेच चित्र जनतेने पाहिले.
पांढऱ्या शुभ्र आलिशान गाडीतून पांढरा पेहराव केलेले नगराध्यक्ष उतरले. पाठीमागून विषय समितीच्या फाईली घेऊन शिपायासह कार्यालयात पोहोचले. त्या अगोदरच पालिका प्रशासनाने ऑनलाईन सभेची यंत्रणा तयार ठेवली होती. सत्ताधारी विकास आघाडी, विरोधी राष्ट्रवादीचे नगरसेवक आपापल्या अड्ड्यावर मोबाईलवर सभेची लिंक उघडून दिल्लीच्या गप्पा मारत होते. नगराध्यक्षांनी सर्वांची हजेरी घेतली. चक्क २९ नगरसेवक ऑनलाईन सभेत सामील झाल्याचे जाहीर केले.
सभेपुढे विषय ठेवण्याअगोदरच विरोधी राष्ट्रवादीचे विश्वास डांगे यांनी नगराध्यक्षांना दिलेले पत्र वाचून दाखविण्याचा प्रयत्न सत्ताधारी विकास आघाडीने गोंधळ करून हाणून पाडला; तर राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे यांनी सभा बेकायदेशीर कशी आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करीत असताना विकास आघाडीचे गटनेते विक्रमभाऊ पाटील वरचेवर संजय कोरे यांच्या सूचनेला व्यत्यय आणण्याच्या खेळ्या करीत होते; तर शिवसेनेचे गटनेते आनंदराव पवार यांनी तर चक्क जिल्हाधिकाऱ्यांनी सभेविषयी काय सूचना दिल्यात, याच वाचून दाखवा, असा हट्ट धरला. हे सर्व गोंधळात चालू असताना कोणालाच कोणाचे काही कळत नव्हते; तर काही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी अध्यक्षांना विनंती केली. आमचे गटनेते संजय कोरे बोलणार आहेत. त्यांचे ऐकून तरी घ्या, असा गोंधळ करीत ठेका धरला. अखेर या गोंधळात ऑनलाईनची यंत्रणाही कोलमडली. अखेर नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना सभा तहकूब करावी लागली, हे इस्लामपूरकरांचे दुर्भाग्य समजावे. यावर सायंकाळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी विकास आघाडीच्या ऑनलाईन सभेची खिल्ली उडविली. आता सत्ताधारी विकास आघाडी याला काय उत्तर देते, हे पाहावे लागेल.