कवठेमहांकाळ : शहरातील विद्यानगर ते जुने बसस्थानक मार्गावरील भुयारी गटारप्रश्नी सुरू असलेले उपोषण शुक्रवारी नगरपंचायतीच्या लेखी आश्वासनानंतर आमदार सुमनताई पाटील यांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आले.
विद्यानगर ते जुने बसस्थानक मार्गावर एक फुटी पाइप असलेले भुयारी गटार मंजूर आहे. त्याचे कामही सुरू करण्यात आले होते. परंतु माजी उपनगराध्यक्ष सिंधुताई गावडे, राहुल गावडे, संजय कोळी तसेच या परिसरातील नागरिकांनी हे गटार तीन फूट पाइप घालून करण्यात यावे यासाठी आंदोलन करून काम बंद केले होते. याच प्रश्नावर गटार तीन फूट पाइप घालून करणयात यावे, या कामाचे पुनर्मूल्यांकन करण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष संजय कोळी गुरुवारपासून तहसीलदार कार्यालयाच्या आवारात उपोषणास बसले होते. या उपोषणास माजी उपनगराध्यक्ष सिंधूताई गावडे यांनी पाठिंबा दिला होता.
शुक्रवारी आमदार सुमनताई पाटील, ताजुद्दीन तांबोळी यांनी उपोषणस्थळी भेट दिली. भुयारी गटार कामाचे पुनर्मूल्यांकन करू, असे मुख्याधिकारी डॉ. संतोष मोरे यांना सांगितले. त्यांनी नगरपंचायतीचा ठराव घेऊन तसे पत्र उपोषणकर्ते कोळी यांना दिले. या लेखी आश्वासनानंतर आमदार पाटील यांच्या हस्ते कोळी यांनी सरबत घेऊन उपोषण सोडले.
यावेळी तहसीलदार बी. जे. गोरे, सिंधूताई गावडे, प्रा. दादासाहेब ढेरे, राहुल गावडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेश पाटील, रवी माने, शेरखान पठाण, विजय गावडे उपस्थित होते.