माईलाच आपण माऊली म्हणून संबोधतो. या माहुलीने सर्व जाती-धर्माच्या मुला, मुलींना, कार्यकर्त्यांना माया दिली. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला ऊर्जा दिली आणि वागण्यातील लीनतेचे धडेही दिले.
झंझावाती वादळासारखे व्यक्तिमत्त्व लाभलेले क्रांतिवीर नागनाथअण्णा यांची पत्नी म्हणून समाजात वावरणे एवढे सोपे नव्हते. माईनी अण्णांच्या कार्यात त्यांना खूप मोठी साथ दिली आणि त्यात त्यांना यशपण आले. या यशाच्या पाठीमागे त्यांची स्वच्छ प्रामाणिक निष्ठा क्रांतिवीर नागनाथअण्णांना समाधान देणारी ठरलेली. अनेक संघर्षमय आणि आघातांच्या प्रसंगात त्यांनी स्वत:च्या घराकडे दुर्लक्ष केलेले होते. त्याच घराला माईनी स्वकष्टाने आर्थिक बळ वाढवून योग्य आकार दिला. स्वत:च्या मुलांना स्वकर्तृत्वाने मोठेपण मिळविण्यासाठी अंतरिक प्रेरणा दिली. अनेक चळवळी, धरण आंदोलने, मोर्चे यात माई अगदी आघाडीवर असते. शेतसाऱ्याच्या धगधगत्या चळवळीत माईनी अनेक व्याख्याने देऊन जनतेची एकजूट वाढविली. क्रांतीवीरांगना लक्ष्मीबाई नायकवाडी तथा परमपूज्य आईसाहेब यांच्या सूचनांचा सन्मानच केला. अगदी लहानमोठ्या घरगुती कामातसुध्दा माई रमून जात. एका महान थोर देशभक्ताची, आमदाराची आपण पत्नी आहोत म्हणून कधी गर्व केला नाही. साधेपण हे त्यांच्या वागण्यातील भूषण होते.