पुनवत : पत्रकारांचा समाजात डोळस वावर हवा. सोपे लिहिण्यासाठी मोठी साधना करावी लागते. अतिरंजक लिहिण्याचा मोह टाळून पत्रकारांनी विश्वासार्हता वाढवावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन यांनी केले.
सागाव (ता. शिराळा) येथे आयोजित पत्रकारांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी ‘लोकमत’चे आवृत्तीप्रमुख श्रीनिवास नागे, ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्त्रबुद्धे, शेखर जोशी, मंगेश मंत्री, संजय भोकरे, प्रकाश कांबळे प्रमुख उपस्थित होते.
प्रा. महाजन म्हणाले की, पत्रकारांनी बातमी प्रमाणभाषेतच लिहावी. शब्दांचे अर्थ माहीत नसले की, ब्रम्हघोटाळे होतात.
श्रीनिवास नागे म्हणाले, ग्रामीण पत्रकारांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रश्नांना भिडले पाहिजे. प्रश्नांची तड लावली पाहिजे. नानाविध विषयांचा शोध घेऊन लिहिले पाहिजे. सामूहिक पत्रकारिता करता कामा नये. वृत्तपत्रांची विश्वासार्हता वाढत असून, मुद्रित माध्यमांना कोणताही धोका नाही.
मंगेश मंत्री म्हणाले की, चळवळीला दिशा देण्यासाठी आजच्या युगात वृत्तपत्रांचे काम महत्त्वाचे आहे. बातमीमुळे कायदा, राष्ट्रहिताला कोणताही धोका पोहोचू नये. जोशी म्हणाले की, बदलत्या युगाबरोबर वृतपत्रांचे स्वरूप व व्याप्ती बदलत आहे. सोशल मीडियाला कोणताही पाया नाही.
चिंतामणी सहस्त्रबुद्धे म्हणाले की, भाषा वृत्तपत्राचा प्राण आहे. वाचकांना समजेल अशी वृत्तपत्रातील बातम्यांची भाषा असणे गरजेचे आहे.
समाराेपप्रसंगी संजय भोकरे म्हणाले की, आत्मपरीक्षण करीत वाटचाल केल्यास निश्चितच अपेक्षित यशापर्यंत मजल मारता येते.
यावेळी शिराळा तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील, सुमंत महाजन, रवींद्र कदम, प्रकाश मोहरेकर, अजित शिंदे, काष्ठशिल्पकार अशोक जाधव, सहदेव खोत, गंगाराम पाटील, एन. जी. पाटील, राजकुमार पाटील, अष्आक आत्तार, गणेश माने, विनायक नायकवडी, धनाजी आसवले, ज्ञानदेव शिंदे, भगवान शेवडे, नारायण घोडे, हिंमतराव नायकवडी, आनंदा सुतार उपस्थित होते. अशोक कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले. श्रेयश महाजन यांनी आभार मानले.
फोटो : ०९ पुनवत १
ओळ : सागाव (ता. शिराळा) येथील पत्रकार कार्यशाळेत प्रा. वैजनाथ महाजन यांनी मार्गदर्शन केले.