सांगली : तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील जनता व कार्यकर्त्यांचे पालकत्व आता जयंतरावांनी स्वीकारावे, असे साकडे आज, मंगळवारी मतदारसंघासह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी घातले. जयंतरावांनीही पालकत्व स्वीकारल्याचे स्पष्ट करीत, येथील जनता व कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील आणि कॉ. गोविंद पानसरे यांना आदरांजली वाहण्यासाठी राष्ट्रवादीच्या सांगली जिल्हा कार्यालयात शोकसभा घेण्यात आली. यावेळी तासगाव, कवठेमहांकाळसह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी या मतदारसंघाच्या पालकत्वाची जबाबदारी जयंतरावांनी स्वीकारावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष इलियास नायकवडी म्हणाले की, आबांच्या निधनाने पक्षाचे, राज्याचे आणि त्यांच्या मतदारसंघातील जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. आबांच्या अंत्यसंस्कारावेळी खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार आणि जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांप्रमाणे काम केले. नेते होऊनही त्यांच्यातील कार्यकर्ता जिवंत आहे. आबांचे कार्य पुढे नेण्यासाठी हे नेते सक्षम आहेत. त्यांचा मतदारसंघ, तेथील जनता आणि कार्यकर्ते यांना आधार देतानाच जयंतरावांनी या भागाची जबाबदारी स्वीकारावी. तासगाव तालुकाध्यक्ष हणमंतराव देसाई म्हणाले की, आर. आर. पाटील यांनी मतदारसंघाच्या विकासाकरिता केलेली मेहनत, त्यांचे कार्य खूप मोठे आहे. आबांवर येथील प्रत्येक कार्यकर्ता आणि जनता विश्वास ठेवून होती. त्यामुळे यापुढील काळातही आबांचे कार्य पुढे नेण्यासाठी नेत्यांनी प्रयत्न करावेत. आबांच्या कुटुंबियांसह मतदारसंघालाही आधार देण्यासाठी जयंत पाटील यांच्यासह अन्य राष्ट्रवादी नेत्यांनी प्रयत्न करावेत. ताजुद्दीन तांबोळी म्हणाले की, आबांच्या निधनाने या मतदारसंघातील जनतेवर, कार्यकर्त्यांवर मोठा आघात झाला आहे. त्यातून सावरणे कठीण जात आहे. आबांची स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी आता पक्षातील अन्य नेत्यांनी घ्यावी. आबांसारखेच मतदारसंघावर प्रेम करून त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यात यश मिळाले, तर ती खरी आदरांजली ठरेल. डी. के. पाटील म्हणाले की, आबांवर येथील जनता किती प्रेम करते हे सर्वांनी पाहिले आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे. तरीही त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रयत्न करावेत. यावेळी वैभव शिंदे यांनी, अंजनी येथे आबांचे स्मारक उभे करावे, अशी मागणी केली. माजी महापौर सुरेश पाटील यांनी, आपला जवळचा मित्र गेल्याचे सांगत आबांच्या आठवणी मांडल्या. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज उपस्थित होते. (प्रतिनिधी)वाऱ्यावर सोडणार नाही : जयंत पाटीलजयंत पाटील म्हणाले की, आबांच्या असण्याने येथील जनतेला, कार्यकर्त्यांना व आम्हालाही एकप्रकारचा आधार होता. जिल्ह्यातील सर्व संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात घेण्याचे जे काम गेल्या काही वर्षांत केले त्यात आबांचा अधिक पुढाकार होता. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघाकडे आम्ही दुर्लक्ष करणार नाही. याठिकाणच्या कार्यकर्त्यांनी, जनतेने चिंता करण्याचे कारण नाही. आबांनी जे कार्य हाती घेतले होते, ते आम्ही पूर्ण करू. याठिकाणच्या योजना, विकासकामे याकडे प्राधान्याने लक्ष दिले जाईल. पक्षाचे नेते शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनीही त्यांच्या कुटुंबियांना मोठा आधार दिला आहे. आम्हीही त्यांच्यासोबत आहोत. पक्षवाढीतून आदरांजली!आबांनी ज्या धडाक्याने या भागात कामे केली, तोच धडाका यापुढील काळात आम्ही ठेवू. त्यांची उणीव भरून काढता येणार नसली तरी, जिल्ह्यात पक्षवाढ करून त्यांना आम्ही आदरांजली वाहू. आम्ही आबांच्या कार्याचा आदर्श घेऊन पुढे जाऊ, असे मत पक्षाचे सांगली जिल्ह्याचे निरीक्षक आ. शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.
पालकत्वासाठी जयंतरावांना साकड
By admin | Updated: February 25, 2015 00:04 IST