लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : औपचारिकता म्हणून दिलेली दोन पदे, पक्षीय पदाधिकाऱ्यांकडून बेदखलपणा आणि संस्थात्मक पातळीवरकुचंबणा यामुळे दिवंगत राष्ट्रवादी नेते आर. आर. पाटील यांचा गट पालकमंत्री जयंत पाटील गटावर नाराज आहे. दोन्ही गटांमध्ये गेल्या धुसफूस सुरू असून, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत ही गोष्ट गेली आहे.
तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात आर. आर. पाटील यांच्या गटाची ताकद मोठी आहे. पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आ. सुमनताई पाटील यांच्याकडे या गटाचे नेतृत्व आले आहे. त्यांचे पुत्र रोहित पाटील राजकारणात सक्रिय झाले आहेत. आर. आर. पाटील यांनी जपलेली नाती पुढे कायम ठेवण्याचा प्रयत्न हे दोन्ही नेते करीत असताना जयंत पाटील यांच्या व त्यांनी नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यात अडथळे येत आहेत.
आर. आर. पाटील यांच्या विरोधकांशी सुसंवाद व त्यांच्या मित्रांशी विसंवाद असा विचित्र अनुभव आर. आर. पाटील गट घेत आहे. दुसरीकडे पक्षीय स्तरावर या गटातील कार्यकर्त्यांना स्पष्टपणे डावलले जात आहे. या गटातील दोघांनाच पदे मिळाली आहेत. जिल्ह्यातील पक्षाच्या एकाही सेलच्या कार्यकारिणीवर या गटातील कार्यकर्त्यांना संधी दिली जात नाही. ज्या काही मोजक्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली आहे, त्यांना कार्यक्रमांना निमंत्रित केले जात नाही. अशा अनेक गोष्टींमुळे पालकमंत्री व आर. आर. पाटील गटात मोठी दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यांतील आर. आर. पाटील गटातील कार्यकर्ते सध्या अस्वस्थ आहेत.
चौकट
शत्रूशी मित्रता, मित्राशी शत्रूता
आर. आर. पाटील आणि सगरे गटाची मैत्री मतदारसंघाला माहीत आहे. तरीही या गटावर सध्या पालकमंत्र्यांची खप्पामर्जी झाली आहे. अडचणीत असलेल्या महांकाली कारखान्याच्या अस्तित्वाच्या दोऱ्या त्यांच्या हाती असतानाही मदतीबाबत त्यांनी हात वर केले आहेत. दुसरीकडे आर. आर. पाटील गटाशी हाडवैर असलेले भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्याशी त्यांची वाढती मैत्रीही आर. आर. पाटील गटाला खटकत आहे.
चौकट
नेत्यांनीही घेतली दखल
आर. आर. पाटील गटाने संस्थात्मक पातळीवर सुरू असलेली कुचंबणा व पालकमंत्र्यांकडून मिळत नसलेली मदत याबाबत पक्षाचे नेते शरद पवार यांच्याकडे तक्रार केली होती. मुंबईत त्याबाबत चर्चाही झाली, मात्र या परिस्थितीत किंचितही बदल झाला नाही. सध्या धुमसत असलेला हा संघर्ष वेळीच थांबला नाही, तर राष्ट्रवादीलाच त्याचा मोठा फटका बसू शकतो.