तासगाव : वडगाव (ता. तासगाव) येथील भारतीय सैन्य दलातील जवान दशरथ पोपट पाटील (वय ३९) यांचा जम्मू येथे कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ही घटना घडली. दुपारी १ वाजता पाटील यांचे बंधू तुकाराम पाटील यांना फोनवरून या दुर्दैवी घटनेची माहिती सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. ही घटना समजल्यानंतर वडगावसह परिसरात शोककळा पसरली आहे.
शहीद दशरथ पाटील हे शेतकरी कुटुंबातील असून, २००० साली ते भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. सुमारे २० वर्षे त्यांनी सैन्यदलात सेवा बजावली आहे. सहा महिन्यांपूर्वी त्यांची जम्मू येथे बदली झाली होती.
दीड महिन्यापूर्वी त्यांच्यासोबत असलेले पत्नी आणि दोन मुले गावाकडे सोडून ते कर्तव्यावर गेले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, नऊ वर्षांची मुलगी, दीड वर्षाचा मुलगा, आई, वडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे. त्यांचे मोठे भाऊ सैन्यदलात सेवा बजावून निवृत्त झाले आहेत.
दशरथ पाटील शहीद झाल्याची बातमी सैन्यदलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाटील यांचे बंधू तुकाराम पाटील यांना फोनवरून सोमवारी दुपारी १ वाजता सांगण्यात आली. या घटनेची माहिती वडगावसह परिसरात समजली. दशरथ पाटील यांचा मृत्यू झाल्याचे समजताच वडगावसह परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.