जयवंत आदाटे - जत शहरातून जाणाऱ्या विजापूर ते गुहागर राज्यमार्गावर असलेल्या कचरा डेपोमुळे आणि त्यातून सतत निघत असणाऱ्या धुरामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावालगत असलेला हा कचरा डेपो अन्यत्र हलविण्यात यावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.विजापूर ते गुहागर राज्यमार्ग जत शहराच्या मधून जातो. या राज्यमार्गावर जत शहरालगत नगरपालिकेने कचरा डेपो केला आहे. कचरा डेपोला लागून हिंदू स्मशानभूमीची जागा आहे. येथील कचरा अन्यत्र हलविला जात नाही किंवा त्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे मागील कित्येक वर्षांपासून कचरा तेथे तसाच पडून आहे. दिवसेंदिवस या कचऱ्यात भर पडत आहे. नगरपालिका आरोग्य विभागातील कर्मचारी मुख्य राज्यमार्गाला लागूनच कचरा टाकत आहेत. रस्त्यापासून पाठीमागे थोडीफार रिकामी जागा आहे. तेथे कचरा टाकल्यास या कचऱ्याचा त्रास काही प्रमाणात कमी होणार आहे, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.नगरपालिकेने टाकलेला कचरा वाऱ्याने इतरत्र उडून जाऊ नये, म्हणून तो पेटवून दिला जातो. त्याचा धूर दिवस-रात्र धुमसत असतो. मोरे कॉलनी, देवकते कॉलनी, समर्थ कॉलनी येथील नागरिकांना या धुराचा आणि यातून निघणारा उग्र वास व दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वयस्कर नागरिक आणि लहान मुले यांना घसा व श्वसनाचा त्रास होऊ लागला आहे. कचऱ्यात पडलेल्या वस्तू खाण्यासाठी मोकाट कुत्री, जनावरे व डुकरांचा येथे सतत वावर असतो. त्यामुळे येथून चालत जाणारे नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.कचरा डेपोला लागून जात असलेला विजापूर ते गुहागर राज्यमार्ग अत्यंत खराब झाला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामध्ये गटार व पावसाचे पाणी साचून दलदल निर्माण झाली आहे. कचरा डेपोलगत असलेली मोकाट जनावरे, रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे येथून जाणाऱ्या वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच काहीवेळा येथे लहान-मोठे अपघात होत आहेत. नगरपालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा आरोप या भागातील नागरिक गणेश गिड्डे, उत्तम चव्हाण, योगेश व्हनमाने यांनी केला आहे.दरम्यान, यासंदर्भात जत नगरपालिका नगराध्यक्ष रवींद्र साळे व मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, कचरा डेपोसाठी पर्यायी जागा मिळावी, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला अद्याप मंजुरी मिळाली नाही. पर्यायी जागा मिळाल्यानंतर येथील कचरा डेपो बंद केला जाणार आहे. आरोग्य विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे रस्त्यालगत कचरा पडला आहे. तो कचरा जेसीबी मशीनद्वारे पाठीमागे ढकलण्यात येणार आहे. पाऊस असल्यामुळे दुर्गंधी पसरू नये म्हणून कचरा पाठीमागे ढकलला नाही. यापुढे कचरा रस्त्यालगत टाकला जाणार नाही, याची दखल नगरपालिका प्रशासन घेईल, असे त्यांनी सांगितले. कचरा डेपो आमच्या भागात नको, असे सर्वजण म्हणतात. जत शहराबाहेर राहणारे नागरिक याला विरोध करत आहेत. हा कचरा काय नगरपालिका करत नसते. नागरिकच कचरा करत असतात. स्वच्छता करण्याचे काम आमचे आहे. डेपोसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन साळे यांनी केले आहे.पर्यायी जागेचा शोधकचरा डेपोसाठी पर्यायी जागा मिळावी, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला अद्याप मंजुरी मिळाली नाही. पर्यायी जागा मिळाल्यानंतर येथील कचरा डेपो बंद केला जाणार आहे. आरोग्य विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे रस्त्यालगत कचरा पडला आहे. तो कचरा जेसीबी मशीनद्वारे पाठीमागे ढकलण्यात येणार आहे. पाऊस असल्यामुळे दुर्गंधी पसरू नये म्हणून कचरा पाठीमागे ढकलला नाही, असे नगराध्यक्ष रवींद्र साळे यांनी सांगितले.
कचरा डेपोमुळे ‘जत’चे आरोग्य धोक्यात
By admin | Updated: October 27, 2014 23:33 IST