संख : जत तालुका दुष्काळी जाहीर करावा, जनावरांसाठी प्रत्येक गावामध्ये चारा डेपो सुरू करावा व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जत पूर्व विभागप्रमुख चंद्रशेखर देबगोंड यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे.जत तालुका कायमचा दुष्काळी तालुका आहे. निम्मा पावसाळा संपला तरीसुद्धा पावसाने दडी दिल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत ८० ते ८५ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. खरीप हंगामातील २९ टक्के पेरण्या झाल्या होत्या. पेरणीतील पिकेही पावसाअभावी जळून गेली आहेत. सध्या पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. खरीप हंगाम सलग तिसऱ्यावर्षी वाया गेला आहे.पाऊस झाला नसल्याने शेतकरी व कष्टकरी लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. आतापर्यंत सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतेला नाही. पिण्यासाठी पाणी नाही. शेतातील पिके गेल्याने व रानात खुरट्या गवताची उगवण झाली नसल्याने जनावरे कशी जगवायची, हा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतातील पिकेही गेलेली आहेत. द्राक्षे, डाळिंब, फळबागा अडचणीत सापडल्या आहेत. शेतकऱ्यांनी फळबागांवर बॅँक, सोसायटीची लाखो रुपयांची कर्जे काढलेली आहेत. त्याची परतफेड कशी करायची, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.दुष्काळी परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून तालुका दुष्काळी जाहीर करावा, जनावरांसाठी प्रत्येक गावामध्ये चारा डेपो सुरू करावा व शेतकऱ्यांची सरसकट कर्जे माफ करावीत. अन्यथा पूर्व भागातील ४४ गावांतील शेतकऱ्यांनी आंदोलन न करता आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे, असे निवेदनात नमूद केले आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनावर राजू पुजारी, नागनाथ शिळीन, चंद्रशेखर देबगोंड आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)सलग तिसऱ्यावर्षी फटका आतापर्यंत ८० ते ८५ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. खरीप हंगामातील २९ टक्के पेरण्या झाल्या होत्या. पेरणीतील पिकेही पावसाअभावी जळून गेली आहेत. सध्या पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. खरीप हंगाम सलग तिसऱ्यावर्षी वाया गेला आहे.
जत तालुका दुष्काळी जाहीर करा
By admin | Updated: August 30, 2015 22:39 IST