संख : जत तालुक्यातील शेतकऱ्यांची कोरोना व अतिवृष्टीने आर्थिक कोंडी झाली आहे. महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी सक्ती करू नये. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करू नये, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयश नाईक यांनी केली आहे. याबाबत जत येथील राजे रामराव महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ए. के. भोसले यांना निवेदन दिले आहे.
जत येथील राजे रामराव महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून प्रवेश घेतेवेळी अर्धी फी घेतलेली आहे. ही फी आर्थिक अडचणी असताना देखील भरलेली आहे. कॉलेज सुरू होऊन पंधरा दिवस झाले आहेत. सध्या विद्यार्थ्यांना राहिलेेेली फीची सक्ती केली जात आहे. त्यांचे परीक्षा अर्ज कार्यालयाकडून भरले जात नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होणार आहे. यामुळे उर्वरीत फी भरण्यासाठी सक्ती करू नये.
अर्ज भरून न घेतल्यास विद्यार्थ्यांचे एक वर्षाचे करिअर वाया जाणार आहे. ताण-तणाव येऊन विद्यार्थ्यांच्या जीवास धोका झाल्यास सर्वस्वी जबाबदार महाविद्यालय, संस्थेची राहील. परीक्षा अर्ज न भरल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
निवेदनावर श्रेयश नाईक, रोहित चव्हाण, प्रमोद काटे, खंडू शिंदे, संदीप नाईक यांच्या स्वाक्षरी आहेत.