जत : तालुक्याच्या पूर्व भागातील आठ गावांतील ३७४ ब्रास अवैध वाळूसाठा व नदी आणि ओढापात्रातून उत्खनन केलेली १७ हजार २७६.२० ब्रास वाळू जप्त करुन संबंधितांकडून दोन कोटी पन्नास लाख चार हजार पाच रुपये इतका दंड वसूल करण्यासाठी महसूल विभागाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे तालुक्यातील वाळू तस्करांत खळबळ माजली आहे.अनधिकृत वाळू उत्खनन व वाळू वाहतूक करणाऱ्यांच्याविरोधात जत तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सलग चार दिवसांपासून विशेष मोहीम राबविली. हळ्ळी येथील राजेंद्र सातपुते, जगाप्पा सातपुते, चंद्रकांत कोळी, मल्लाप्पा कुंभार, श्रीमंत खवेकर, आक्कळवाडी येथील दुर्गाप्पा पवार, करजगी येथील मलकारी सिदनिंगाप्पा, रवी भीमशा, बिराप्पा कळ्ळी, मोरबगी येथील विठ्ठल कतनळ्ळी, नागाप्पा कांबळे, बेळोंडगी येथील सिदनिंगाप्पा लगाड, रुपसिंग पवार यांचा डंपर (केए २८, बी. ७२१९) व बेळोंडगी ते अंकलगी रस्त्यालगत पडलेली वाळू असा सुमारे ३७४ ब्रास अवैध वाळूसाठा जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत चार लाख ७६ हजार ८५० रुपये इतकी आहे. बोर नदीपात्रासह ओढापात्रातून सुमारे १७ हजार २७६.२० ब्रास वाळू उपसा केला आहे. त्याची किंमत सुमारे दोन कोटी वीस लाख २७ हजार १५५ रुपये इतकी होत आहे. संशयित विनापरवाना वाळू उपसा, साठा करणाऱ्यांना नोटीस देऊन खुलासा मागविला असून तो समाधानकारक नसेल, तर त्यांच्याकडून दंड वसूल केला जाणार आहे.या कारवाईत प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार डी. एम. कांबळे, मंडल अधिकारी पी. आर. कोळी आदी सहभागी होते. (वार्ताहर)
जतमध्ये १७,६५० ब्रास वाळू साठा जप्त
By admin | Updated: November 27, 2014 00:19 IST