गळ्यातील चेन मोडायची वेळ आली, कसले ‘ब्रेक द चेन’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:25 AM2021-04-10T04:25:38+5:302021-04-10T04:25:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गळ्यातील सोन्याची चेन मोडायची वेळ आली, आता कसले ‘ब्रेक दि चेन’ अशा संतप्त भावना ...

It's time to break the chain, what kind of 'break the chain'? | गळ्यातील चेन मोडायची वेळ आली, कसले ‘ब्रेक द चेन’?

गळ्यातील चेन मोडायची वेळ आली, कसले ‘ब्रेक द चेन’?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गळ्यातील सोन्याची चेन मोडायची वेळ आली, आता कसले ‘ब्रेक दि चेन’ अशा संतप्त भावना व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर करताच व्यावसायिक रस्त्यावर येत आहेत.

व्यावसायिकांना सरकारवरील संताप व्यक्त करण्यासाठी आंदोलनात्मक मार्ग उपलब्ध असले, तरी त्यांच्यामागे घर सांभाळणाऱ्या गृहिणींना मात्र कोणताही पर्याय नाही. व्यावसायिक अडचणींनी हैराण झालेल्या नवऱ्यापुढे दररोज नवनव्या आर्थिक अडचणी मांडण्याचे धैर्यही आता गृहिणींमध्ये राहिलेले नाही. एरवी मध्यमवर्गीय व्यापाऱ्यांच्या घरी आर्थिक प्रवाह कमी-जास्त प्रमाणात अखंड असायचा, पण लॉकडाऊनने तो थांबल्याने गृहिणींची तारांबळ ‌उडाली आहे. दररोजच्या लहान-सहान खर्चांना आवर घालावा लागत आहे. छोट्या-मोठ्या बचतीला कधीच ओहोटी लागली आहे. वर्षातून एकदा ठरणारी सहल किंवा खरेदीच्या हौसमौजेला लगाम घालावा लागला आहे. मुलांचे दररोजचे खर्च भागवितानाही दमछाक होत आहे. एरवी अशा दैनंदिन किरकोळ खर्चांची बाजू नेहमीच पत्नीवर सोडून दिली जाते, तीच आता महिलांसाठी डोईजड होऊ लागली आहे.

चौकट

पाचच महिने व्यवसाय, देणी फेडायची कशी?

ऑक्टोबरपासून व्यवसाय जेमतेम सुरू झाले. खूप जोरात नसले, तरी दैनंदिन खर्चाची तोंडमिळवणी होत राहिली. लवकरच व्यवसायाचे गाडे नेहमीप्रमाणे रुळावर येईल आणि बाहेरची देणी भागवू, असे नियोजन होते, पण आता अचानक ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर झाल्याने कर्जे फेडायची कशी, असा प्रश्न उभा राहिला आहे. काहींनी व्यवसायाच्या भरवशावर उधार-उसनवार करून बॅंकांचा मार्चअखेर भागविला, ते आता नव्या संकटात सापडले आहेत.

पॉईंटर

१५० दिवस

जिल्ह्यात सुुरू राहिली दुकाने

कोट

सततच्या लॉकडाऊनने कौटुंबिक तणाव वाढतोय

घरातील दररोजच्या खर्चाची जबाबदारी माझ्यावरच होती. शाळा व क्लासेसची फी, मोलकरीण, दळण, पेपरवाला, मुलांचा पाॅकेटमनी हा खर्च मलाच करावा लागायचा. लॉकडाऊन पुन्हा सुरू झाल्याने आता काटकसर करावी लागत आहे. गेल्या वर्षभराचा अनुभव असल्याने आतापासूनच नव्याने बचत सुरू केली आहे. कुटुंबाचा व्यवसाय बंद असल्याने पैशासाठी तगादा लाऊन चालत नाही.

- दीपा कापसे, मिरज

गेल्या वर्षभरातील लॉकडाऊनमध्ये माझी वैयक्तिक बचत केव्हाच संपून गेली. अनेकदा रेशनच्या तांदळातून पाककृती तयार करून हॉटेलिंगची हौस घरातच भागविली. दिवाळीनंतर दुकान पुन्हा सुरू झाल्याने थोडासा दिलासा मिळाला होता. आता लॉकडाऊन पुन्हा लांबले, तर काय करायचे, हा दररोज सतावणारा प्रश्न आहे.

- सीमा रणदीवे, सांगली

घरखर्चासाठी हातचे राखून पैसे मिळू लागल्याने पतीच्या व्यवसायातील मंदी लगेच जाणवली. दिवाळीनंतर दुकाने सुरू झाली, तरी नेहमीप्रमाणे ग्राहक नव्हते, त्यामुळे घरात आर्थिक कारणावरून काही वेळा खटकेही उडाले, पण आता पुन्हा लॉकडाऊनमुळे हौसेमौजेला आवर घातला आहे. मुलांनाही फार सांगावे लागत नाही.

- स्वाती नवाळे, सांगली

Web Title: It's time to break the chain, what kind of 'break the chain'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.