सांगली : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असतानाच येत्या २५ व २६ ऑगस्ट रोजी पुन्हा पाऊस धो-धो बरसणार आहे. भारतीय हवामान खात्याने याबाबतचा अंदाज रविवारी वर्तविला आहे.
जिल्ह्यात शनिवारी पावसाने उघडीप दिली होती, मात्र रविवारी पहाटे पावसाने सांगली, मिरज परिसरात हजेरी लावली. तासभर पाऊस झाल्यानंतर पुन्हा दिवसभर उघडीप दिली, मात्र ढगांची दाटी कायम आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी दोन दिवस असेच वातावरण कायम राहणार असून, २५ व २६ ऑगस्ट रोजी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्यानंतर पुन्हा पावसाचा जोर घटणार आहे.
ढगांची दाटी कायम असली तरी तापमानात चढ-उतार होत आहे. रविवारी जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान ३०, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. यात येत्या दोन दिवसांत अंशाने वाढ होण्याचा अंदाज आहे. किमान व कमाल तापमान ऑगस्टच्या सरासरीपेक्षा अधिक आहे.