अशोक पाटील ल्ल इस्लामपूर गेल्या ३० वर्षात आमदार जयंत पाटील यांच्या इशाऱ्यावरच नगरपालिकेतील नगराध्यक्षांचा कारभार सुरू आहे. आता नगराध्यक्ष पदाचे त्यांचे उमेदवार विजयभाऊ पाटील असले तरी, आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच जयंत पाटील यांचा प्रचार सुरू आहे. त्यांनी पालिका निवडणूक प्रतिष्ठेची बनवली असून, ‘होम टू होम’ ठिय्या मांडून प्रचारात रंगत आणली आहे. आघाडी शासनाच्या माध्यमातून आ. पाटील यांनी इस्लामपूर शहरासाठी कोट्यवधीचा निधी आणला. परंतु पालिकेतील कारभाऱ्यांनी संगनमत करून टक्केवारीतून निधीवर वेळोवेळी डल्ला मारला आहे. शिवाय एकमेकांवर कुरघोड्या करून उपनगरांतील विकास कामांचे तीनतेरा वाजवले आहेत. पाणी टंचाईच्या काळातही शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू दिली नाही, ही सत्ताधाऱ्यांची जमेची बाजू आहे. त्यांनी जाहीर केलेली ‘२४ बाय ७’ योजना मात्र अजूनही कागदावरच आहे. शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी महादेवनगर, कापूसखेड रस्त्यावर घरकुल योजना पूर्ण केली आहे. परंतु या घरकुलांचा लाभ ज्या लाभार्थ्यांना होणे गरजेचे होते, त्यांना झालेला नाही. घरकुलांचे बांधकाम निकृष्ट झाल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांतीलच काहींनी केला आहे. सत्ताधाऱ्यांतील मतभेद अनेकवेळा चव्हाट्यावर आले तरी, आ. पाटील यांनी त्यावर पांघरुण घातल्याने, शहरातील राष्ट्रवादीचा आलेख ढासळला आहे. विरोधकांची ताकद नसल्याने प्रभागातील विकास कामांच्या निधी वाटपावरून सत्ताधाऱ्यांमध्येच अनेकवेळा वाद उफाळून आले आहेत. त्यामुळे उपनगरांतील विकास खुंटला आहे. या प्रभागातून तीव्र नाराजीचा सूर आहे. अनेकजण आ. पाटील यांच्या सभेतच बोलू लागले आहेत. आ. पाटील यांच्या स्वप्नातील इस्लामपूर साकारण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला आहे. त्यामध्ये पोहण्याचा तलाव, बगीचे, घनकचरा नियोजन, नाट्यगृह, खुले नाट्यगृह, प्रशासकीय इमारत, प्रशस्त पोलिस ठाणे, न्यायालयीन इमारती उभ्या राहिल्या आहेत. परंतु संबंधित विभागाकडून देखरेख आणि नियोजनाअभावी विकास कामांवर पाणी फिरले आहे. याचा दोष मतदार पदाधिकाऱ्यांना देतात. गेल्या दोन निवडणुकीत जयंत पाटील यांना मानूनच ते मतदान करतात. यावेळी मात्र सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वारे वाहू लागले आहे. गेल्या दोन निवडणुकीत अचानक उद्भवलेल्या विरोधकांच्या वादळाला जयंत नक्षत्राने शमवले होते. आता ऐन थंडीत विरोधकांनी हवा गरम केली आहे. त्यातच निशिकांत पाटील यांच्यासारखा खमक्या मोहरा विरोधकांना लाभला आहे. त्यामुळे इस्लामपूरची सांगली महापालिका होण्याअगोदरच जयंत नक्षत्र बरसण्यास सुरुवात झाली आहे. आ. पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला आहे. विरोधकांनी, राज्यात, केंद्रात आमची सत्ता आहे, येणाऱ्या पाच वर्षात इस्लामपूरची ‘बारामतीची तेरामती’ करण्यापेक्षा स्मार्ट सिटी निश्चितच बनवू. शहरासाठी लागणारा निधी आणि सर्वसामान्यांच्या हिताचा विकास आराखडा अंमलात आणू, असा विरोधकांकडून जोमाने प्रचार आता सुरु झाला आहे. त्यामुळे इस्लामपूर शहराच्या नगरपालिका निवडणुकीत आता चांगलाच रंग भरु लागला आहे. वाघाचा कार्यक्रम करा... प्रभाग क्र. ४ मध्ये जयंत पाटील यांनी होम टू होम प्रचार करण्याचा एककलमी कार्यक्रम आखला आहे. या प्रभागात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार उमेदवार आहेत. त्यांच्या नावाचा उल्लेख न करता, ‘वाघाचा कार्यक्रम करा’, असे आवाहन मतदारांना केले जात आहे. त्यामुळे या प्रभागातील मतदान चुरशीने होणार आहे. यासाठी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहेत.
इस्लामपूरची निवडणूक जयंतरावांच्या प्रतिष्ठेची
By admin | Updated: November 16, 2016 23:36 IST