इस्लामपूर : अवकाळी पावसाच्या दणक्याने तापलेले वातावरण आणि आग ओकणारा सूर्य डोक्यावर घेत शहर व परिसरातील तरुणाईने रंगांची उधळण करीत आज बेधुंदपणे रंगपंचमीचा आनंद लुटला. रंगपंचमीच्या या आनंदाला बऱ्याच ठिकाणी डीजे च्या दणदणाटाची साथ लाभली, तर कोंडूस्करच्या गोळ्याही बऱ्याचजणांनी रिचविल्याने त्यांचा बेभान ताल काही औरच होता.शहरात आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या पारंपरिक रंगपंचमीला उधाण आले होते. लहान चिमुरड्यांनी तोंडाला रंग फासून पाण्याचा मारा करीत या उत्सवाला सुरुवात केली. त्यानंतर सूर्याचा पारा जसा चढला, तसे रंगवलेल्या चेहऱ्यांसह तरुणाई मोटारसायकलवरुन रंग उधळत रस्त्यावरुन फिरु लागली. रासायनिक रंगांचा फाटा देत नैसर्गिक रंगांचा आणि पाण्याचा वापर, हे या रंगपंचमीचे वैशिष्ट्य ठरले.चौका—चौकात आणि गल्लोगल्लीच्या अरुंद रस्त्यांवरही रंगपंचमीची धमाल सुरु होती. शिवाजी चौक, गांधी चौक, जयहिंद चित्रमंदिर परिसर, आष्टा नाका, अहिल्यादेवी चौक, शिराळा नाका, गणेश मंडई, होळकर डेअरी, महावीर चौक अशा प्रमुख ठिकाणी डॉल्बीच्या दणदणाटात रंगपंचमीला उधाण आले होते. पाण्याच्या काहिली आणि खासगी टँकरमधील पाण्याचे फवारे मारत तरुणाईने रंगपंचमी साजरी केली. दरम्यान, नगरपालिकेत प्रशासनासह पदाधिकारीही रंगात न्हाऊन निघाले. न्यायालयाशेजारीच पालिकेची इमारत असल्याने तेथे गलबला होताच न्यायालयातून सूचना केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांचा फौजफाटा येईपर्यंत इथली रंगपंचमी उरकण्यात आल्याने, तेथील शांतता पाहून पोलीस परतले. रंगमंचमीचे हे वातावरण सायंकाळी सहा वाजेपर्यंत होते. (वार्ताहर)‘मुक्तांगण’मध्ये रंगपंचमीद्वारे जागृतीनैसर्गिक रंगाने रंगपंचमी खेळून मुक्तांगण प्ले स्कूलमधील चिमुकल्यांनी धमाल केली. वेगवेगळे सामाजिक विषय घेऊन चेहरा आणि शरीर रंगवण्याची स्पर्धा झाली. पालकांनी मुलांचे चेहरे रंगवताना ‘मुलगी वाचवा, खेळातून शिक्षण, जय-जवान, वृक्षतोड थांबवा, वाघ वाचवा, हसत खेळत राहा, स्वच्छ भारत’ असे संदेश रेखाटले. साक्षर भारत, समृध्द भारत दर्शवताना राष्ट्रध्वजाची रंगसंगती केली. येथील प्रशासकीय इमारतीच्या परिसरात मुक्तांगण प्ले स्कूलमध्ये चार वर्षाच्या आतील मुलांना विविध अनुभव दिले जातात. रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर पाणी वाचवा, रासायनिक रंगांचा वापर टाळा, असा संदेशही या स्पर्धेतून दिला गेला. तीसहून अधिक मुलांनी आणि पालकांनी सहभाग घेतला. मुलांनी उत्साही वातावरणात स्वत:चे चेहरे रंगवून घेतले. झेंडू, पळस, बीट, हळदीपासून कलर तयार करुन आणले होते. स्कूलच्या संचालिका वर्षाराणी मोहिते, पूनम साटम, सायली शिंगे, मनीषा मोरे यांनी संयोजन केले.
इस्लामपुरात तरुणाई रंगपंचमीत बेधुंद...
By admin | Updated: March 12, 2015 00:06 IST