फोटो- इस्लामपूर येथील रूपाली पाटील या मुलीने साकारलेला सजीव देखावा.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कोरोना महामारीमुळे प्राथमिक शाळा दोन वर्षांपासून बंद आहेत. मुलांना ऑनलाईन शिक्षण, मोबाईलवरील अभ्यास करून कंटाळा आला आहे. ही परिस्थिती डोक्यात घेवून पाचवीत शिकणाऱ्या रूपाली जालिंदर पाटील या मुलीने आम्हाला मोबाईल नको, टीव्ही नको, आम्हाला शाळेतील फळा पाहिजे. शासनाने आमच्या शाळा लवकरात लवकर सुरू कराव्यात, हा सजीव देखावा साकारला आहे.
शहरातील प्रभाग १ च्या परिसरात राहणाऱ्या रूपालीने वृत्तपत्रामधील शाळा सुरु करण्यासबंधी आलेल्या बातम्यांची कात्रणे, मोबाईल, वही, पेन, पुस्तके, बॅग, कंपास, फळा, खडू या शालेय वस्तूचा वापर या देखाव्यात केलेला आहे. तिच्या या देखाव्यात तिने मुलांच्या, पालक, शिक्षकांच्या मनातील व्यथा मांडली आहे. शासनाने लवकरात लवकर शाळा सुरू कराव्यात अशी मागणी करणाऱ्या रूपालीच्या या देखाव्यातील मांडणी आणि संकल्पना पाहून प्रत्येकजण तिचे अभिनंदन करत आहे.