इस्लामपूर : फोर जी वाय-फाय इंटरनेट सुविधेमुळे इस्लामपूर शहराने डिजिटल इंडियाच्या स्वप्नाला गवसणी घातली आहे. शिक्षणाचा आग्रह धरणाऱ्या नव्या पिढीला जगाच्या पाठीवरील माहिती आणि ज्ञानाचे भांडार या सुविधेमुळे उपलब्ध होणार आहे. देशातील पहिले वाय-फाय शहर ठरलेल्या इस्लामपुरातील युवा पिढी जगातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करेल. भविष्यकाळ हा युवा पिढीचा आहे. त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर विधायक आणि चांगले नवनिर्माण करण्यासाठी करावा, असे आवाहन माजी मंत्री व आमदार जयंत पाटील यांनी केले.इस्लामपूर नगरपालिकेतर्फे शहरात सुरु करण्यात आलेल्या फोर जी वाय-फाय सेवेचा लोकार्पण सोहळा आ. पाटील यांच्याहस्ते झाला. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड अध्यक्षस्थानी होते. सिनेअभिनेत्री सई ताम्हणकर, उमेश दुर्वे, अमित लुतरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.सिनेअभिनेत्री सई ताम्हणकर म्हणाल्या, फोर जी वाय-फाय सेवेचा वापर युवा पिढीने स्वत:ला वैचारिक आणि सामाजिकदृष्ट्या प्रगल्भ बनवण्यासाठी करावा. स्वत:चे भविष्य घडवायचे की बिघडवायचे याचा निर्णय करा. इस्लामपूर हे माझे आजोळ आहे ते एज्युकेशनल हब बनल्याचा मला अभिमान आहे. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड म्हणाले, सांगली जिल्ह्याच्या ब्रॅन्डिंग करण्याच्या उपक्रमात या संपूर्ण शहराला वाय-फाय सेवा देणाऱ्या क्रांतिकारी निर्णयाची भर पडली आहे. फोर जी वाय-फाय सेवा देणारे इस्लामपूर देशातील पहिले शहर ठरले आहे. जिल्ह्याचा गेल्या १०० वर्षातील सर्व क्षेत्रातील इतिहास जगात पोहोचवणार आहोत. जिल्ह्यातील इतर शहरेही वाय-फाय करण्याचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादीचे नगरपरिषदेतील पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे निमंत्रक सभापती खंडेराव जाधव यांनी स्वागत केले. माजी उपनगराध्यक्ष अॅड. चिमण डांगे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. सूरज चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. उपनगराध्यक्ष संजय कोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास मृणालिनी ताम्हणकर, सौ. वंदना गायकवाड, पोलीस उपअधीक्षक वैशाली शिंदे, प्रांताधिकारी विजय देशमुख, तहसीलदार रुपाली सरनोबत, आनंदराव मलगुंडे, शहाजी पाटील, सदानंद पाटील, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, पी. आर. पाटील, विनायकराव पाटील, बाळासाहेब पाटील, अरुणादेवी पाटील यांच्यासह मान्यवर, नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)विजय भटकर यांच्याकडून कौतुकफोर जी वाय-फाय सेवेचे उद्घाटन केल्यानंतर हे शहर वाय-फाय करावे, अशी इच्छा व्यक्त करणाऱ्या महापरम संगणकाचे निर्माते शास्त्रज्ञ विजय भटकर यांच्याशी संपर्क साधला गेला. त्यांनी मुंबईतून या उपक्रमाचे कौतुक करुन आमदार जयंत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले. आ. पाटील म्हणाले, फोर जी वाय-फाय सेवा देणारे इस्लामपूर शहर भारतातील पहिले शहर ठरले आहे. तरुण पिढीचा भविष्यकाळ उज्ज्वल होण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरेल. त्यांच्यासाठी अत्यंत परिश्रमपूर्वक ही सेवा उभारली आहे. यापुढील काळातही टीका करणाऱ्यांकडे लक्ष न देता जे काही चांगले असेल ते आणणार आहोत. फोर जी वायफाय सेवेमुळे शहर खऱ्या अर्थाने हायफाय होणार आहे. तरुणांनी या सेवेचा लाभ घेऊन आपल्या स्वप्नांना गवसणी घालावी, अशी सदिच्छाही जयंत पाटील यांनी यावेळी तरुणांना दिली.
इस्लामपूर देशातील पहिले ‘वायफाय’ शहर
By admin | Updated: September 7, 2015 22:51 IST