लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील साखर सम्राटांवर शेतकरी नेते राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांची दहशत होती; परंतु भाजप सरकारने यांची नखे छाटली आहेत. त्यामुळे या दोन नेत्यांनी विविध पक्षांच्या छत्रछायेखाली राजाश्रय घेतला आहे. आता राष्ट्रवादीने या दोघांचे कार्यक्षेत्र असलेल्या इस्लामपूर मतदारसंघात शेतकऱ्यांच्या बाजूने भाजप विरोधात ट्रॅक्टर मोर्चा काढून या शेतकरी नेत्यांची धार बोथट करण्याचा डाव आखला आहे.
विधानसभा निवडणुकीपासून राज्यात राष्ट्रवादीची घोडदौड पाहता प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पक्षाची ताकद वाढविण्यासाठी राज्यात पुन्हा संपर्क दौरे सुरू केले आहेत. त्यामुळे त्यांच्या अपरोक्ष इस्लामपूर मतदारसंघाची जबाबदारी युवा नेते प्रतीक पाटील सांभाळत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी वीज बिल दरवाढ, एफआरपी आणि दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा यासाठी आंदोलनाबरोबर राज्यात संपर्क वाढविला आहे. याउलट रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी भाजपचा झेंडा घेऊन थेट राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनाच टार्गेट करून भाजपमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांच्या धोरणाला पाठिंबा देत आक्रमक भूमिका घेतली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी हे विधानसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी पक्षाच्या राजाश्रयाला जाऊन बसले आहेत. त्यामुळेच त्यांना आमदारपद देण्याच्या हालचाली झाल्या होत्या. आता त्या थंडावल्या आहेत. आता पुन्हा त्यांनी शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे, तर रयत क्रांती संघटनेचे माजी कृषी राज्यमंत्री, आ. सदाभाऊ खोत हे मूळचे वाळवा तालुक्यातील आहेत. ते शरद पवार यांना टार्गेट करत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून पुन्हा रयत संघटनेत सक्रिय झाले आहेत. या दोघा शेतकरी नेत्यांची भूमिका पाहता राष्ट्रवादी पक्षाने इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे युवा नेते प्रतीक पाटील यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भव्य ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन केले. त्यामुळे इस्लामपूर मतदारसंघात या दोन शेतकरी नेत्यांची धार बोथट झाल्याची चर्चा राष्ट्रवादीतून आहे.
फोटो - १००२२०२१-आयएसएलएम-इस्लामपूर राजकीय न्यूज
जयंत पाटील, प्रतीक पाटील, राजू शेट्टी, सदाभाऊ खोत.