आटपाडी : सामाजिक बांधिलकी जपत कोरोनाबाधित पार्थिवांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या तरुणाईचे कौतुक करत आटपाडीकरांनी त्यांना संरक्षण कवच दिले आहे. कसलीही भीती न बाळगता तालुक्यातील ५२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या पाच तरुणांना जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून प्रत्येकी पाच लाख असे एकूण २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले आहे.
श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून या पाचही तरुणांना त्यांच्या विमा पॉलिसी अमरसिंह देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या. कोरोना आजारामुळे एखादा रुग्ण मृत्यू पावल्यास संसर्गाच्या भीतीमुळे अंत्यविधीसाठी कुणी पुढे येत नाहीत. काही वेळा मृतदेहाची हेळसांड होते.
अशावेळी आटपाडी येथील गणेश महादेव जाधव, प्रसाद सूर्यकांत नलवडे, सुरज राजाराम जाधव, संदेश दत्तात्रय पाटील व प्रशांत भाऊसाहेब पाटील या पाच तरुणांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आजपर्यंत ५२ मृतदेहांचे अंत्यसंस्कार विनामोबदला करून तरुणाईची शक्ती विधायक कामालाही लावता येते, हा आदर्श घालून दिला आहे. या तरुणांची ही निरपेक्ष वृत्तीने चाललेली धडपड पाहून अमरसिंह देशमुख यांनी दि बाबासाहेब देशमुख सहकारी बँक, श्रीमंत बाबासाहेब देशमुख सुतगिरणी, श्रीमंत बाबासाहेब देशमुख दूध संघ, दि आटपाडी एज्युकेशन सोसायटी, दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे सेवक सहकारी पतमंडळ या संस्थांतर्फे या पाच जणांचे प्रत्येकी पाच लाख अशी एकूण २५ लाखांची विमा पॉलिसी काढून त्यांच्या कार्याची पोहोच दिली आहे.
याप्रसंगी श्रीमंत बाबासाहेब देशमुख दूध संघाचे व्यवस्थापक अशोक दौंड, दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे सचिव एच. यु. पवार, दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे सेवक पतमंडळाचे अध्यक्ष डी. एन. कदम, दि बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेचे व्यवस्थापक सुरेश सागर, सतीश भिंगे, रुपेशकुमार देशमुख उपस्थित होते.